टोकियो । विश्वविजेत्या डेन्मार्कच्या विक्टर अॅक्सल्सेनने मलेशियाच्या ली चाँग वेईचा पराभव करत जपान ओपन सुपर सीरिज बॅडमिंटन स्पर्धेतील पुरुष एकेरीचे विजेतेपद मिळवले. महिला गटातील एकेरीच्या लढतींमध्ये रिओ ऑलिम्पिकमधील सुवर्णपदक विजेत्या चीनच्या बिंगजियाओला हरवून स्पेनच्या कॅरोलिने मरीनने अजिंक्यपदावर नाव कोरले.
चीनच्या लिन डॅनचा पराभव करुन गेल्या महिन्यात ग्लासगोमध्ये झालेल्या जागतिक स्पर्धेचे सुवर्णपदक मिळवणार्या विक्टरने गतविजेत्या लीचा 21-14, 19-21, 21-14 असा पराभव केला. याआधी गेल्या वर्षासह सहावेळा ही स्पर्धा जिंकणार्या लीने पहिला गेम गमावल्यावर दुसरा गेम जिंकून सामन्यातली उत्कंठता वाढवली होती. पण विक्टरने तिसर्या आणि निर्णायक गेममध्ये लीला वरचढ होण्याची संधी मिळू न देता सामन्याचा निकाल आपल्या बाजूने लावला. महिलांच्या एकेरीच्या लढतीत लंडन ऑलिम्पिक विजेत्या मरिनने बिंगजियाओलाचा 23-21, 21-12 असा पराभव केला.
दुहेरीच्या लढतींमध्ये जपानच्या रिओ ऑलिम्पिकपदक विजेत्या आयका ताकाहाशी आणि मिसाकी मत्सुतोमोने दक्शिण कोरियाच्या किम हा ना आणि काँग ही याँगचा 21-18, 21-16 असा पराभव करत आपल्या चाहत्यांना आनंद मिळवून दिला. पुरुष दुहेरीच्या अंतिम फेरीत जपानच्या पुरुष दुहेरी ताकातो इनू आणि युकी कनाके यांना इंडोनेशियाच्या मार्कस फर्नलादी गिदोन आणि केविन संजय सुकामुलोजो यांच्याकडून 21-12, 21-15 असा पराभव पत्करावा लागला. मिश्र दुहेरीत चीनच्या वँग यिलू आणि हुआंग डोंगपिंगने जपानच्या टेकिनो होकी व सयाका हिराता यांचा 21-13, 21-8 असा पराभव केला.