विक्रमगड तालुक्यातील विविध रानभाज्यांचा महोत्सव उत्साहात!

0

पालघर । चिंब पाऊस अल्लड वारा, धुंद हवा मृदगंध नवा रानातूनी बहरे रानमेवा, तयाचा मज आस्वाद हवा, या वर्णनासारखे अगदी नितांत सुंदर, श्यामल आणि पावसाळी व सर्वात महत्त्वाचे म्हणजे प्रदूषण मुक्त अस्सल नैसर्गिक वातावरण तयार झालेल्या व शरीरासाठी उपयुक्त असणार्‍या जंगलातून शोधून आणलेल्या रानभाज्यांचे महोत्सव विक्रमगड तालुक्यातील कर्हे (माडाचापाडा) येथे जनकल्याण समिती महाराष्ट्र प्रांत व कृतज्ञता सहयोग नाशिक तसेच ग्रामविकास समिती श्रीराम मित्र मंडळ कर्हे यांच्या संयुक्त विद्यमानाने आयोजीत करण्यात आले होते. आपल्याला माहीतही नाहीत अशा खरशेंगा, करडू, नाळभाजी, कोहरेल पाला, बाफलीचा पाला, आघाडा, आकर घोडा यांसारख्या रानभाज्यांसहित विविध औषधी असणार्‍या शंभरहून अधिक रानभाज्यांचा समावेश या महोत्सवात होता.

विविध ठिकाणच्या लोकांनी प्रदर्शनास भेट देऊन भाज्यांचे जाणून घेतले महत्त्व
येथील आदिवासी महिला रानावनातून विविध प्रकारच्या भाज्या घेऊन येत असतात. सदर प्रदर्शनात मांडलेल्या भाज्या, त्याची चव, त्या कश्या बनवाव्या यांची माहिती घेण्यासाठी मुंबई, पुणे, नाशिक अश्या विविध ठिकाणच्या लोकांनी प्रदर्शनास भेट देऊन या भाज्याचे महत्त्व जाणले. या रानभाजी महोत्सवाचे आयोजन राष्ट्रीय स्वयम सेवक संघ जनकल्याण समिती महाराष्ट्र प्रांतचे डॉ. मुंगी,र ाष्ट्रीय स्वयंसेवक संघ जनकल्याण समितीचे जिल्हाध्यक्ष भाऊ मनोरे, कोकण संभाग सहकार्यवाहक अविनाश घाट यांनी केले होते. सदर महोत्सवात आदिवासी संस्कृतीत मानला जाणारा व महाराष्ट्र राज्याकडून पुरस्कार मिळालेले घागली वादक म्हसे बाबा, माजी पंचायत समिती सुरेश देवळे, माजी सरपंच जगन्नाथ हिलीम उपस्थित होते.

पावसाळ्यात येणार्‍या वनस्पतीचा उपयोग आहारात करता यावा तसेच औषधी वन भाज्याचे महत्त्व जुन्या पिढीला माहीत आहे. परंतु, नव्या पिढीला त्याची माहिती व्हावी व वन भाज्यांचे संवर्धन व्हावे यासाठी या महोत्सवाचे आयोजन आम्ही करीत असतो.
– डॉ. विक्रांत मुंगी
पूरक पोषक आहार योजना प्रमुख

सदर रान भाज्यांच्या प्रदर्शनातून निसर्गाची किमया काय आहे ती कळली व विशेषत मी आयुर्वेदिक डॉक्टर असून या रानभाजी महोत्सवातून रुग्णांना उपयुक्त असणार्‍या गोष्टीची माहिती देण्यास सुलभ होईल.
– डॉ. अजिंक्य नेरली
आयुर्वेदिक डॉक्टर,पुणे.