विक्रेत्यांनी कृषी निविष्ठांची माफक दरात विक्री करावी

0

तालुका कृषी अधिकारी पी.डी.देवरे ; भुसावळात कृषी निविष्ठा विक्रेत्यांना प्रशिक्षण

भुसावळ- कृषी निविष्ठा विक्रेत्यांनी शासनाने दिलेल्या सूचनेनुसारच माफक दरात कृषी निविष्ठांची विक्री करणे आवश्यक असल्याची सूचना तालुका कृषी अधिकारी पी.डी.देवरे यांनी दिली. कृषी निविष्ठा विक्रेत्यांची एक दिवसीय तालुकास्तरीय प्रशिक्षण कार्यशाळा पंचायत समितीच्या सभागृहात सोमवारी झाली. यावेळी देवरे यांनी उपस्थित कृषी निविष्ठा विक्रेत्यांना मार्गदर्शन केले. पंचायत समितीच्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर सभागृहात सोेमवारी कृषी निविष्ठा विक्रेत्यांची तालुकास्तर खरीप हंगामपूर्व गुण नियत्रंण प्रशिक्षण कार्यशाळा तालुका कृषी अधिकारी पी.डी.देवरे यांच्या अध्यक्षतेखाली झाली.

दर्जेदार कृषी निविष्ठा माफत दरात विक्री करा
कृषी निविष्ठा विक्रेत्यांना मार्गदर्शन करताना देवरे म्हणाले की, गतवर्षी बोंड अळीमुळे शेतकर्‍यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने शेतकर्‍यांची आर्थिक परीस्थिती गंभीर आहे. सर्व कृषी निविष्ठा विक्रेत्यांनी दर्जेदार व माफक दरात कृषी निविष्ठांची विक्री करणे आवश्यक आहे. इतकेच नव्हेतर कृषी निविष्ठा विक्रेत्यांच्या दुकानांची कृषी विभागाच्या माध्यमातून नमुन्यांची तपासणी केली जाणार आहे. शासनाच्या माध्यमातून मागील वर्षापेक्षा जास्त नमुने तपासणी करण्याचे लक्षांक देण्यात आले आहेत. शिवाय भरारी पथकाव्दारे दुकानांची अचानक तपासणी केली जाणार असल्याने विक्रेत्यांनी परवाने, साठा रजिष्टर, बिल नोंदवही व इतर नोंदी अद्यावत ठेवणे आवश्यक असल्याचे देवरे म्हणाले. यावेळी वजनमापे निरीक्षक खैरनार, भारंबे, कृषी मंडळ अधिकारी श्रीकांत झांबरे, पंचायत समिती विस्तार अधिकारी प्रदीप धांडे यांच्यासह तालुक्यातील सर्व कृषी सेवा केंद्र धारकांची उपस्थिती होती. यावेळी मंडळ कृषी अधिकारी श्रीकांत झांबरे यांनी परवाना नूतनीकरणाच्या नवीन पद्धतीबाबत व आकारणी शुल्काबाबत उपस्थित कृषी केंद्र धारकांना माहीती दिली.

तक्रार निवारण कक्ष होणार स्थापन
तालुक्यात पंचायत समितीस्तरावर 15 मे पासून तक्रार निवारण कक्ष स्थापण होणार आहे.शिवाय भरारी पथकाची स्थापना करण्यात आली असून कृषी केंद्र धारकांनी विक्री परवाना केंद्राच्या दर्शनी भागात लावावा. या शिवाय भरारी पथकाचे मोबाईल नंबर, टोल फ्री क्रमांक, भाव फलक व साठा फलक लावण्याची सुचना पंचायत समितीचे विस्तार अधिकारी प्रदीप धांडे यांनी प्रास्ताविकात दिली.

बंदी असलेले वाण विक्री करू नये
विक्रीसाठी बंदी असलेले वाण, कीटकनाशके, मुदतबाह्य निविष्ठा विक्री केंद्रावर ठेवू नये तसेच प्रत्येक बिलावर ग्राहकांची स्वाक्षरी घेणे बंधनकारक असून कीटकनाशकांच्या सुरक्षित हाताळणीबाबत बिलाच्या पाठीमागील बाजूस छपाई करून संदेश देण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.

बोगस बियाणे विक्रेत्यांवर कारवाई होणार
बोगस वाणामूळे शेतकर्‍यांना मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होवून शेतकर्‍यांना अनेक अडचणीचा सामना करावा लागतो. यासाठी शेतकर्‍यांना बोगस बियाणे करून फसवणूक करणार्‍या कृषी सेवा केंद्र धारकांवर शासनाच्या आदेशाप्रमाणे कठोर केली जाणार आहे. शिवाय शेतकर्‍यांनीही चांगल्या प्रकारे ओळख करूनच वाणाची खरेदी करण्याचे आवाहन कृषी विभागाच्या माध्यमातून करण्यात आले आहे.