जळगाव । ऊन,वारा,पाऊस, शहरातील उदंड झालेली भटकी कुत्र्यांची संख्या, बेदरकार वाहने चालवणारे विद्यार्थी अशा विविध अडचणींची तमा न बाळगता वृत्तपत्र विक्रेता हा वाचकांपर्यंत वृत्तपत्र पोहचवतो. कारण ते नाशवंत असते. याची जाणीव विक्रेत्याला असते. मात्र या विक्रेत्याप्रती सामाजिक जाणीवा संवेदनशील झाल्या पाहिजेत, असे प्रतिपादन जेष्ठ वृत्तपत्र विक्रेते दगडू चौधरी यांनी केले.
मू.जे.महाविद्यालयाच्या जनसंवाद आणि वृत्तविद्या विभागात शनिवारी 23 डिसेंबर रोजी सकाळी वितरण व्यवस्थापन या विषयी शहरातील वृत्तपत्र विक्रेत्यांचे गेस्ट लेक्चर आयोजित करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. मंचावर गोपाळ चौधरी, विलास वाणी, रवींद्र जोशी यांच्यासह प्रा. विश्वजीत चौधरी, दिलीप तिवारी, प्रवीण चौधरी, प्रशांत सोनवणे उपस्थित होते.
प्रस्तावनेत प्रा. विश्वजीत चौधरी यांनी विक्रेत्यांचे जीवनमानाविषयी सांगत भूमिका मांडली. विलास वाणी यांनी, कोणतेही काम सवयीने सोपे होते असे सांगत वृत्तपत्र वितरणाचे काम आजच्या पिढीला कमी दर्जाचे वाटते अशी खंत व्यक्त केली. तसेच, वृत्तपत्रातील सत्य घटना वाचकांपर्यंत पोचविण्याचे काम जनजागृतीचे वाटते असे सांगितले. गोपाळ चौधरी यांनी, वृत्तपत्र विक्रेत्यामध्ये मनुष्यबळ आवश्यक असते हे सांगत विक्रेता हा ओले पेपर घेवून कोरडे पेपर वाचकांपर्यंत पोचवतो हि भावना व्यक्त केली.