मुंबई : विक्रोळी पार्क साईट हनुमान नगर येथील झोपडपट्टी पुर्नविकास प्राधिकरण प्रकल्पाबाबत माहिती अधिकार कार्यकर्ते संदीप येवले यांनी शुक्रवारी मुंबई मराठी पत्रकार संघात घेतलेल्या पत्रकार परिषदेत स्थानिक नागरिकांनी येवले यांच्यावरच भ्रष्टाचाराचे आरोप करत पत्रकार परिषद सुरू असताना मोर्चा आणला. त्यामुळे काही काळ पत्रकार संघ परिसरात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. त्यामुळे पोलिसांनी मध्यस्थी करत परिस्थिती नियंत्रणात आणली.
विक्रोळी पार्क साईट हनुमान नगर येथे झोपडपट्टी पुर्नविकास प्रकल्प होत आहे. अंदाजे 5 हजार कोट्यवधी रुपयांच्या या प्रकल्पात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला असून त्यात बिल्डर ओंकार डेव्हलपर्स यांनी कौशिक मोरे यांच्या तर्फे मला 11 कोटींची ऑफर दिली होती असे येवले म्हणाले. त्यातील 1 कोटी रुपये घेऊन 23 दिवसांपूर्वी 40 रूपये माध्यमांसमोर ठेवले होते. त्यानंतर पार्क साईट पोलीस ठाणे, मुंबई पोलीस आयुक्त, लाचलुचपत विभाग, आयकर विभागात तक्रार करण्यास गेलो. मात्र तेथे कोणीही माझी दखल घेतली नसल्याचे येवले म्हणाले.
कोणतीच कारवाई नाही
माझ्याकडे 40 लाख रुपये असल्यामुळे पोलिसांनी मला अटक करावी अशी मागणी केली असता माझ्यावर कोणतीच कारवाई केली नसल्याचे येवले यांनी म्हटले. 1 कोटी रुपयांतील 60 लाख रुपये 290 लोकांवर ज्या केस सुरू होत्या. त्यावर 5 हजार प्रमाणे खर्च केले. तर उर्वरीत रक्कम मुलुंड उपजिल्हाधिकारी, एसआरए, अपर जिल्हाधिकारी चर्चगेट असे एकूण 15 हजार रुपये मिटिंग, झेरॉक्स, पेपर, बॅनर आधीवर खर्च केले असून त्या सर्वांची पोचपावती माझ्याकडे असल्याचे येवले यांनी सांगितले.
संदीप येवलेंनी केलेल्या मागण्या
या प्रकल्पाला योजनेला स्थगिती मिळावी. या योजनेत वाटण्यात आलेल्या काळ्या पैशांची चौकशी करावी, झोपडपट्टी पुर्नविकास प्राधिकरण, म्हाडा यांतील अधिकार्यांची चौकशी करून गुन्हा दाखल करावा. विश्वास पाटील हे यातील मुख्य आरोपी असून 13/2 ची नोटीस गहाळ केलेली आहे. एसआरए योजना बंद करून सरकारने झोपडपट्टी धारकास 600 फुटांचे घर द्यावे, तसेच माझ्याजवळील 40 लाख रुपये आदिवासी कल्याण यंत्रणा व अपंगांसाठी खर्च करण्यास शासनाने परवानगी द्यावी.