भुसावळात आमदार संजय सावकारे यांचे प्रतिपादन ; पालिकेतर्फे 25 घंटागाड्यांचे लोकार्पण
भुसावळ- शहरात गेल्या काही दिवसांपासून विघ्नसंतोषी अॅक्टीव्ह झाले असून कचराकुंड्यांना आग लावण्यासह शौचालयाची नासधुस करणे व पाईपलाइन फोडणे, हायमास्ट फोडण्याचे प्रकार व प्रमाण दिवसागणिक वाढत असून या लोकांची वृत्ती व शिकवण वाईट असल्याने ते असे प्रकार करतात, आपण मात्र या प्रकाराकडे दुर्लक्ष करून चांगली कामे सुरूच ठेवावीत, असे मत आमदार सावकारे यांनी येथे व्यक्त केले. आमदारांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून पालिकेने खरेदी केलेल्या 25 घंटागाड्यांचे मंगळवारी पालिका कार्यालयाच्या आवारात लोकार्पण करण्यात आले. याप्रसंगी आमदार बोलत होते. दरम्यान, दिवसभरात चाहत्यांसह, हितचिंतक व कार्यकर्त्यांनी आमदारांवर शुभेच्छांचा वर्षाव केला तर सायंकाळी त्यांच्या हस्ते व माजी मंत्री एकनाथराव खडसे यांच्या हस्ते काशीराम नगरात नाना-नानी पार्कचे उद्घाटन करण्यात आले.
घंटागाड्या असलेली भुसावळ पालिका -आमदार
स्व: मालकिच्या घंटागाड्या असलेली राज्यातील भुसावळ ही पहिली पालिका असल्याची माहिती आमदार संजय सावकारे यांनी दिली. राज्य शासनाच्या घनकचरा व्यवस्थापनात कंत्राटदारालाच घंटागाड्या खरेदी कराव्या लागतात, अशी योजना आहे, मात्र शहरातील अडचणी, व्याप्ती आदींबाबत विनंती केल्याने राज्य शासनाने राज्यात प्रथमच भुसावळात पालिकेला घंटागाडी खरेदीची परवानगी दिल्याचे ते म्हणाले.
स्वच्छता ही निरंतर चालणारी प्रक्रिया
देशभरात अस्वच्छ शहर म्हणून भुसावळची गणना झाल्यानंतर पालिका कर्मचारी व आकाश कल्याण फाऊंडेशनने मेहनत घेवून शहराला स्वच्छ शहराचा दर्जा मिळवून दिला, असे आमदार यांनी सांगत स्वच्छता ही निरंतर चालणारी प्रक्रिया आहे. लोक कचरा टाकतच राहतील, उचलण्याचे काम आपल्याला करायचे आहे, यामुळे कर्मचार्यांनीही आपले काम निरंतरपणे करावे, असे आवाहनही त्यांनी केले. नवीन घंटागाड्यांना जीपीएस सिस्टीम बसविण्यात आल्याने सर्व भागांमध्ये गाडी जाईल, काही भागात गाडी गेली नाही तर जीपीएस ट्रॅकींकमधून ही माहिती समोर येईल व अडचणी सोडवल्या जातील, अशी माहितीही त्यांनी दिली.
काम करणार्या नगरसेवकांना निधी द्या -नाथाभाऊ
स्वच्छतेसाठी काम करणार्या नगरसेवकांना त्यांच्या प्रभागाच्या विकासासाठी अधिक निधी द्यावा किंवा नवीन योजना त्या वॉर्डात सुरू करता येतील काय? यासाठी प्रयत्न करावे, असे माजी मंत्री एकाथराव खडसे यांनी सांगत शौचालयांच्या दरवाजे तोडण्याचे काम करणार्या विकृत प्रवृत्तीकडे दूर्लक्ष करण्याचे आवाहन केले.
यांची होती उपस्थिती
व्यासपीठावर माजी मंत्री तथा आमदार एकनाथराव खडसे, नगराध्यक्ष रमण भोळे, उपनगराध्यक्षा लक्ष्मी मकासरे, मुख्याधिकारी रोहिदास दोरकुळकर तर कार्यक्रमासाठी माजी प्रभारी नगराध्यक्ष युवराज लोणारी, आरोग्य सभापती मेघा वाणी, भाजपा संघटन सरचिटणीस प्रा.सुनील नेवे, स्विकृत नगरसेवक मनोज बियाणी, नगरसेवक अॅड.बोधराज चौधरी, प्रमोद नेमाडे, निर्मल कोठारी, महेंद्रसिंग ठाकूर, सतीश सपकाळे, पाणीपुरवठा सभापती राजेंद्र नाटकर, सविता मकासरे, किरण कोलते, शे. शफी, देवेंद्र वाणी, माजी नगरसेवक राजेंद्र आवटे, आकाश कल्याण फाऊंडेशनचे संचालक संतोष ठाकूर, पवनकुमार झा आदींसह पालिकेचे सर्व कर्मचारी उपस्थित होते.
नाना-नानी उद्यानाचा शुभारंभ
आमदारांच्या वाढदिवसानिमित्त शहरातील वेडिमाता मंदिर रस्त्यावरील काशीराम नगरात स्व.अटलबिहारी वाजपेयी नाना-नानी उद्यानाचा शुभारंभ माजी मंत्री एकनाथराव खडसे व आमदार संजय सावकारे यांच्याहस्ते सायंकाळी झाला. या कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते ज्येष्ठांना काठी वाटप तसेच लग्नास 50 वर्ष पूर्ण झालेल्या जोडप्यांना भेटवस्तू देवून सन्मानीत करण्यात आले तसेच चिमुकल्यांना खेळण्यांचे वाटप करण्यात आले.
यांची होती कार्यक्रमास उपस्थिती
व्यासपीठावर नगराध्यक्ष रमण भोळे, राजेंद्र नाटकर, किरण कोलते, पिंटू कोठारी, महेंद्रसिंग (पिंटू) ठाकूर पुरूषोत्तम नारखेडे, प्रमोद सावकारे, दीपक धांडे, दिनेश नेमाडे, मनोज बियाणी, मेघा वाणी, शोभा नेमाडे, ज्येष्ठ नागरीक संघाचे अध्यक्ष डी.एन.ढाके, राजेंद्र आवटे, सतीश सपकाळे, रजनी सावकारे, भाजपा महिला आघाडी शहराध्यक्षा मीना लोणारी यांची उपस्थिती होती.