विघ्नहर’कडून दिवाळीसाठी सवलतीच्या दरात साखर

0

कारखान्याचे अध्यक्ष सत्यशिल शेरकर यांची माहिती

जुन्नर : तालुक्यातील श्री विघ्नहर सहकारी साखर कारखान्याचे सभासद, तसेच ऊस उत्पादकांना दिवाळी सणाकरीता सवलतीच्या दरात आणि आकर्षक अशा पॅकिंगमध्ये साखर वाटप शुक्रवार पासून सुरू करण्यात आले आहे. ही साखर वाटप कारखाना कार्यक्षेत्रातील एकूण 18 शेतकीगट कार्यालयांमार्फत करण्यात येत असल्याची माहिती अध्यक्ष सत्यशिल शेरकर यांनी दिली.

तीन प्रकारात पॅकींग..

याबाबत माहिती सांगताना सत्यशिल शेरकर म्हणाले की, जुन्नर, शिरोली बुद्रुक, ओझर, ओतूर, बनकरफाटा, पिंपळवंडी, भोरवाडी, धोलवड, राजुरी, बोरी बुद्रुक, साकोरी, निमगांवसावा, नारायणगांव, खोडद, कळंब, निरगुडसर, घोडेगांव आणि आर्वी या 18 गावांमधील कारखान्याच्या शेतकीगट कार्यालयांमार्फत सभासद, ऊस उत्पादकांना दिवाळी सणाकरीता सवलतीच्या दराने आणि आकर्षक अशा 5 किलो, 10 किलो आणि 20 किलो पॅकिंगमध्ये साखर वाटप सुरू राहणार असून, यापूर्वी दसर्‍यानिमित्त उंब्रज शेतकीगट कार्यालयातून उंब्रज आणि परिसरातील गावांतील सभासद, ऊस उत्पादकांना साखर वाटप करण्यात आले असल्याचे सत्यशिल शेरकर यांनी सांगितले.

पॅकिंगमुळे वाहतुक सुलभ…

विघ्नहर कारखाना नेहमीच सभासद आणि ऊस उत्पादक शेतकरी यांचे हित जोपासत असून सभासद आणि ऊस उत्पादक शेतकरी यांना विघ्नहर कारखान्याकडून दरवर्षी सवलतीच्या दरामध्ये साखर पुरविली जाते. मात्र, यंदा दिवाळी सणानिमित्ताने विशेष अशा आकर्षक पॅकिंगमध्ये साखर पुरविली जात असल्याने या पॅकिंग सुविधेमुळे सभासद, ऊस उत्पादकांना आपल्या घरापर्यंत साखरेची वाहतूक करण्यास सुलभ होणार असल्याचे शेरकर यांनी यावेळी सांगितले.

शेतकर्‍यांकडून समाधानाची भावना..

विघ्नहर कारखान्याचे सवलतीच्या दरातील साखर वाटप प्रत्येक शेतकीगट कार्यालयांमार्फत म्हणजेच सभासद, ऊस उत्पादकांच्या गावातच आणि घराजवळ उपलब्ध करून देत असल्यामुळे सभासद आणि ऊस उत्पादक शेतकरी वर्गात समाधानाचे व्यक्त केले जात असून, साखर घेण्याकरीता सभासद आणि ऊस उत्पादकांची कारखाना कार्यक्षेत्रातील शेतकीगट कार्यालयांमध्ये गर्दी होतानाचे दिसून येत आहे. या सवलतीचे साखर वाटप 5 नोव्हेंबर 2018 पर्यंत शेतकीगट कार्यालयांमार्फत करण्यात येणार असल्याने सभासद, ऊस उत्पादकांनी साखर वेळेत घेऊन जावी, असे आवाहन सत्यशिल शेरकर यांनी केले आहे.