पुणे । वारजे येथील विघ्नहर नागरी सहकारी पतसंस्थेत 2 कोटी 63 लाख 26 हजार 947 रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी माजी अध्यक्षाला पोलिसांनी अटक केली. त्याला 13 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश विशेष न्यायाधीश जे.टी.उत्पात यांनी दिला आहे.तानाजी निवृत्ती मोरे (65, रा. वारजे) असे पोलीस कोठडी झालेल्याचे नाव आहे. या प्रकरणात संस्थेच्या आणखी 15 पदाधिकार्यांवर गुन्हा दाखल आहे. याबाबत जिल्हा लेखापरीक्षक आर.एन.शेळके यांनी पोलिसात फिर्याद दिली आहे. वारजे पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक पी.एन.खांडेकर या प्रकरणाचा तपास करत आहेत. ही घटना सन 2010 ते 2013 या कालावधीत घडली. बोगस कर्ज प्रकरणे, बोगस तारणे ठेवून कर्ज देऊन, कर्जदारांकडून कमिशन घेऊन, दिलेल्या कर्जाची वसुली न करता पतसंस्थेत 2 कोटी 63 लाख रुपयांचा अपहार झाल्याप्रकरणी वारजे पोलिसात गुन्हा दाखल आहे. या प्रकरणी पोलिसांनी तानाजी याला अटक करून न्यायालयात हजर केले.
त्यावेळी तो 1996 ते 2014 या कालावधीत पतसंस्थेत संचालक, सहसचिव, उपाध्यक्ष आणि अध्यक्ष म्हणून कार्यरत होता. त्याने बोगस कर्ज तयार केली आहेत. याबाबात तपास करण्यासाठी आणि फरार साथीदारांच्या शोधासाठी त्याला पोलीस कोठडी देण्याची मागणी सहायक जिल्हा सरकारी वकील सुनील हांडे यांनी केली.