पिंपरी-चिंचवड : ’गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया’चा आसमंतात घुमणारा जयघोष…, ढोल-ताशांचा दणदणाट…, गुलालची मुक्त उधळण…, अशा अपूर्व उत्साहात तसेच चैतन्यदायी व मंगलमय वातावरणात शुक्रवारी पिंपरी-चिंचवड शहरात सर्वत्र लाडक्या बाप्पाचे आगमन झाले. सार्वजनिक गणेश मंडळांमध्येदेखील मोठ्या हर्षोल्लासात विघ्नहर्ता गणरायाची प्रतिष्ठापना करण्यात आली. बाप्पाच्या आगमनामुळे भक्तांच्या चेहर्यावर अपूर्व उत्साह आहे. शुक्रवारी सकाळपासूनच शहरात विघ्नहर्त्याच्या स्वागतासाठी मिरवणुका सुरू झाल्या. त्यानंतर पवित्र मंत्रोच्चारात विधीवत पूजा-अर्चा केल्यानंतर गणरायाची प्रतिष्ठापना करण्यात आली. पहाटेपासून अधूनमधून कोसळणार्या पावसाच्या सरींमुळे भक्तांच्या आनंदाला उधाण आले होते. दिवसभर टप्प्याटप्प्याने पाऊस सुरूच होता. मात्र, तरीही भक्तांचा आनंद तसूभरही कमी झाला नाही. लाडक्या बाप्पाला घरी घेऊन जाताना चिमुकल्यांच्या चेहर्यावरील आनंद डोळ्यांचे पारणे फेडणारा होता. सार्वजनिक गणेश मंडळांच्या विलोभनीय गणेशमूर्ती व स्वागत मिरवणुका पाहण्यासाठी घराबाहेर पडलेल्या नागरिकांच्या गर्दीने शहरातील मुख्य रस्ते फुलून गेले होते.
सिद्धिविनायक समूहाच्या कार्यालयात ‘श्रीं’ची प्रतिष्ठापना
सिद्धिविनायक समूहाच्या मुख्य कार्यालयातही शुक्रवारी सकाळी लाडक्या गणरायाची मोठ्या हर्षोल्लासात प्रतिष्ठापना करण्यात आली. सिद्धिविनायक समूहाचे संस्थापक अध्यक्ष तथा दैनिक ‘जनशक्ति’चे मुख्य संपादक कुंदन ढाके व सौ. कांचन ढाके यांच्या हस्ते विधीवत पूजा-अर्चा करण्यात आली. याप्रसंगी सिद्धिविनायक समूहाचे कर्मचारीवृंद उपस्थित होते.
ढोल-ताशांचा दणदणाट
गणरायाच्या स्वागतासाठी निघालेल्या मिरवणुकांमध्ये ढोल व ताशांचा प्रचंड दणदणाट केला जात होता. सार्वजनिक गणेश मंडळांचे कार्यकर्ते ढोल-ताशांच्या तालावर थिरकत होते. जस-जसा ढोल व ताशांचा गजर वाढत होता; तस-तसा कार्यकर्त्यांचा उत्साह व आनंद द्विगुणित होत होता. मिरवणुकांमध्ये अबालवृद्धांनी सहभाग नोंदवला. बाप्पाच्या आगमनामुळे बालगोपाळांमध्ये विशेष आनंदाचे वातावरण होते. मिरवणुकांमध्ये सहभागी झालेल्या काहींनी कपाळावर तर काहींनी हाताच्या मनगटाला भगव्या रंगाच्या ‘गणपती बाप्पा मोरया’ लिहिलेल्या पट्ट्या बांधल्या होत्या. घरात प्रतिष्ठापनेसाठी गणेशमूर्तीची खरेदी केल्यानंतर लगेच तेथूनच बाप्पाची सवाद्य मिरवणूक काढली जात होती. तर मोठ्या सार्वजनिक गणेश मंडळांनीदेखील टप्प्याटप्प्याने मिरवणुका काढल्या.
पारंपरिक वाद्यांनी वेधले लक्ष
गेल्या महिनाभरापासून गणेशभक्तांना लागलेली गणपती बाप्पाच्या आगमनाची ओढ अखेर शुक्रवारी पूर्ण झाली. गणेश चतुर्थीच्या शुभ मुहूर्तावर घराघरात तसेच लहान-मोठ्या सार्वजनिक गणेश मंडळांकडून गणरायाची स्थापना करण्यात आली. गणरायाच्या मिरवणुकीत यंदा लहान व मोठ्या सार्वजनिक गणेश मंडळांकडून डॉल्बी, ब्रास बॅँड व डीजे अशा कर्णकर्कश व जीवघेण्या वाजंत्रीऐवजी ढोल-ताशे, झांज, लेझीम अशा पारंपरिक वाद्यांना पसंती देण्यात आली होती. पारंपरिक वाद्यांनी शहरवासीयांचे लक्ष वेधून घेतले. त्याचप्रमाणे अनेक नागरिकांनी तसेच सार्वजनिक गणेश मंडळांनी गुलालाची उधळण न करता फुले व पाकळ्यांची उधळण करत एक नवा आदर्श घालून दिला. पूजा-अर्चा साहित्याच्या खरेदीसाठी सकाळपासून बाजारपेठांमध्ये गर्दी झाली होती. सायंकाळनंतर तर बाजारपेठा गर्दीने फुलून गेल्या. विक्रेत्यांचे रस्त्यांवर अतिक्रमण, मंडळांचे मंडप यातून चिंचोळ्या बनलेल्या जागेमुळे सगळीकडे वाहतूक कोंडीचे चित्र सर्वत्र दिसत होते. मात्र, उत्साहामुळे कोठेही गोंधळ किंवा वादाचे प्रसंग घडले नाहीत. कोंडी सोडविण्यासाठी वाहतूक पोलिसांची मोठी तारांबळ उडाली.
गणरायाच्या आगमनाने बाजारपेठेत चैतन्य
विघ्नहर्ता गणरायाच्या आगमनामुळे पिंपरी-चिंचवड शहरातील बाजारपेठेत नवचैतन्य संचारले होते. गणेशमूर्ती, पूजेचे साहित्य, पेढे व मिठाई खरेदीसाठी नागरिकांची प्रचंड गर्दी बाजारपेठेत झाली होती. झेंडू व गुलाबाची फुले, केळीची पाने व खांब, श्रीफळ, विड्याच्या पानांच्या खरेदीलाही ग्राहकांचा चांगला प्रतिसाद लाभत होता. त्यामुळे गुरुवारपासूनच शहरातील बाजारपेठेत लाखो रुपयांची आर्थिक उलाढाल झाली. गणपतीच्या प्रतिष्ठापनेनंतर प्रसादासाठी पेढे व मिठाई लागते. त्यामुळे बुधवारपासूनच पेढे, मिठाई व माव्याच्या मोदकांच्या मागणीत दुप्पटीने वाढ झाली होती. शुक्रवारी सकाळपासून तर स्वीट मार्टच्या दुकानांवर पेढे व मिठाई खरेदीसाठी ग्राहकांची मोठी गर्दी झाली होती. गावराणी तूप व बुंदीच्या लाडूंनाही विशेष मागणी होती, असे विक्रेत्यांनी सांगितले.
पूजेचे साहित्य खरेदीही जोरात
गणरायाच्या पूजेसाठी लागणार्या साहित्याला मोठी मागणी होती. यामध्ये नारळ 15 ते 20 रुपये प्रति नग, पाच फळे 20 ते 50 रुपये, नागवेलीची 12 पाने 10 ते 15 रुपये, सर्व पूजा असलेली पुडी व लाल कापड 20 ते 50 रुपये, दुर्वा 5 ते 10 रुपये जुडी या प्रमाणे पूजेचे साहित्य विक्री होत होते. गणपती मूर्ती घेतल्यानंतर त्याच परिसरात फिरस्ती करून पूजेचे साहित्य विक्री करणार्यांकडून या वस्तूंची खरेदी केली जात होती. बाजारपेठांवरही बाप्पाचेच राज्य दिसले. झेंडूच्या फुलांपासून मोदकांच्या मागणीत कमालीची वाढ झाली आहे. ‘जीएसटी’मुळे ठप्प झालेल्या बाजारपेठेतही बाप्पाच्या आगमनाने चैतन्य निर्माण झाल्याचे दिसून आले.
मोदकांना मागणी वाढली
बाप्पांच्या आगमनाच्या पार्श्वभूमीवर गणपतीच्या आवडत्या मोदकांना मागणी असून, रेडिमेड मोदकांनी मिठाईची दुकाने सजली आहेत. यामध्ये तीन प्रकारच्या मोदकांचा समावेश असून त्यांना मागणी वाढली आहे. पूर्वी तसे घरीच मोदक तयार केले जात होते. मात्र, आता घरगुती मोदकांसह तयार मोदकांनाही पसंती वाढली आहे. बाप्पाच्या आगमनाच्या पूर्वसंध्येपासून हे मोदक खरेदीसाठी गर्दी झाली होती. सध्या बाजारात मावा, केशरी मोदक, मैदा व खोबर्याचे मोदक, काजू मोदक उपलब्ध आहे. यामध्ये मैदा व खोबर्याच्या मोदकांना जास्त मागणी आहे. यातील मावा मोदक दहाही दिवस उपलब्ध राहणार असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले. तर इतर मोदक पहिल्या व शेवटच्या दिवसांसह मागणीनुसार उपलब्ध करून दिले जाणार आहेत. बाप्पाची हौस पुरवण्यासाठी मिठाईच्या दुकानांपासून फुल मार्केटमध्ये शुक्रवारी भक्तांनी गर्दी केली होती.
उशिरापर्यंत चालल्या मिरवणुका
शुक्रवारी सकाळपासूनच गणरायांच्या स्वागताची लगबग सुरू झाली होती. गणरायाची मुहूर्तावर प्रतिष्ठापना करण्यासाठी अनेकांनी लवकर तयारी केली. घरगुती प्रतिष्ठापनेचे काम तिसर्या प्रहरापर्यंत जवळपास पूर्ण झाले होते. मात्र, बहुसंख्य सार्वजनिक गणेश मंडळांच्या स्वागत मिरवणुका दुपारनंतर सुरू झाल्या. अनेक गणेश मंडळांच्या मिरवणुका रात्री उशिरापर्यंत सुरू होत्या. विधीवत पूजा-अर्चा केल्यानंतर गणरायाची प्रतिष्ठापना करण्यात आली. सकाळी स्वागत मिरवणुकांचा जोर कमी होता. मात्र, दुपारी तीननंतर मिरवणुकांचा जोर वाढला.