विघ्नहर्ता गणरायाला भावपूर्ण निरोप!

0

खेड व मावळ तालुक्यात शांततेत व वेळेत पार पडल्या विसर्जन मिरवणुका

पिंपरी-चिंचवड । ढोल-ताशांचा दणदणाट, झांज पथकांचा निनाद, लेझिम पथकांचे शिस्तबद्ध संचलन आणि भंडारा व फुलांची मुक्त उधळण, ‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’, ‘एक दोन तीन चार… गणपतीचा जयजयकार…’चा जयघोष, अशा प्रसन्न आणि भक्तीमय वातावरणात खेड व मावळ तालुक्यात विघ्नहर्ता गणरायाला भावपूर्ण निरोप देण्यात आला. विसर्जन मिरवणुका सर्वत्र निर्विघ्न व वेळेत पार पडल्या. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन करत सर्वच सार्वजनिक गणेश मंडळांनी यंदा डीजे व डॉल्बी साऊंड सिस्टीमला नाकारत ढोल-ताशा, झांज या पारंपरिक वाद्यांना पसंती दिली. विशेष म्हणजे, गणेश विसर्जन मिरवणुकीत कोणत्याही मंडळाने गुलाल न उधळता भंडारा व फुलांची उधळण करत आनंद व्यक्त केला. मावळ तालुक्यातील देहूरोड, तळेगाव दाभाडे, वडगाव मावळ, लोणावळा तसेच खेड तालुक्यातील चाकण, खेड, राजगुरूनगर येथे गणेशोत्सवाच्या शेवटच्या दिवशी म्हणजेच अनंत चतुर्दशीला लाडक्या गणरायाचे अपूर्व उत्साहात विसर्जन करण्यात आले. विसर्जन काळात कोठेही अनुचित प्रकार घडू नये, म्हणून पुणे ग्रामीण पोलिसांच्या वतीने चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

चिंबळीत गणेश विसर्जनाचा अपूर्व उत्साह
चिंबळी । येथे ‘गणपती बाप्पा मोरया… मंगलमूर्ती मोरया…’ ‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’, ‘एक दोन तीन चार… गणपतीचा जयजयकार…’, अशा जयघोषात आणि ढोल-ताशांच्या दणदणाटात लाडक्या गणपती बाप्पाला निरोप देण्यात आला. चिंबळी येथील राजे शिवछत्रपती मित्र मंडळ, केसरी प्रतिष्ठान, हनुमान तरूण मित्र मंडळ, स्वरूप मित्र मंडळ, केळगाव येथील रघुनाथ मित्र मंडळ, मरकळ येथील लोखंडे तालिम मित्र मंडळ, मोई येथील जय बजरंग मित्र मंडळ तसेच चिंबळीफाटा येथील श्री समर्थ स्कूल व कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी काढलेल्या विसर्जन मिरवणुकीने ग्रामस्थांचे लक्ष वेधून घेतले. अतिशय शिस्तबद्ध रितीने गणेश विसर्जन मिरवणुका पार पडल्या. विशेष म्हणजे, सर्वच मंडळांनी डीजे साऊंड सिस्टीम व गुलालाचा वापर न करता पारंपरिक वाद्य तसेच फुलांची उधळण करण्यास पसंती दिली. पद्मावती मंदिर येथील तळ्यात गणेश मूर्तींचे विसर्जन करण्यात आली. आळंदी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नंदकुमार गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार पृथ्वीराज पाटील, पी. एन. रासकर यांनी चोख बंदोबस्त ठेवला.

लोणावळ्यात नऊ तास रंगली विसर्जन मिरवणूक
लोणावळा । शहरात मंगळवारी तब्बल नऊ तास गणपती विसर्जन मिरवणुकीचा सोहळा रंगला. ही मिरवणूक पाहण्यासाठी लोणावळा शहरासह पंचक्रोशीतील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. सायंकाळी सव्वाचारला मानाचा पहिला रायवूड गणेश मंडळाचा गणपती विसर्जन मिरवणुकीसाठी मार्गस्थ झाला. पाच वाजता हा गणपती मावळा पुतळा चौकात दाखल झाला. त्यानंतर मानाचे पहिले पाचही गणपती या ठिकाणी रांगेत आले. तेव्हा खर्‍या अर्थाने मिरवणुकीला सुरुवात झाली. रात्री दीड वाजता सर्व बाप्पांचे विसर्जन शांततेत पार पडले. अतिशय उत्साहपूर्ण वातावरणात व निर्विघ्नपणे ही मिरवणूक पार पडली. विशेष म्हणजे, या मिरवणुकीत सर्व गणेश मंडळांनी प्रशासनाच्या व न्यायालयाच्या आदेशाचे काटेकोर पालन करत पारंपरिक वाद्यांचा गजर करत डीजेमुक्त मिरवणूक पार पाडली. पावसाने चांगली उघडीप दिल्याने परिसरातील नागरिकांनी विसर्जन मिरवणुकीचा सोहळा पाहण्यासाठी मोठी गर्दी केली होती. आठ वाजता मानाचे गणपती जयचंद चौकात व नऊ वाजता शिवाजी चौकात दाखल झाले. मावळा चौक, जयचंद चौक, शिवाजी चौक व विजया बँकेसमोरील चौकांमध्ये गणेश मंडळांसमोरील ढोल-ताशा पथकांनी सादरीकरण केले. रात्री दहा वाजता मानाचा पहिला रायवूड गणेश मंडळाचा गणपती विसर्जन घाटावर दाखल झाला. त्याठिकाणी आरती करत बाप्पांची मूर्ती लोणावळा धरणात विसर्जनासाठी नेण्यात आली. मानाचा दुसरा तरूण मराठा मित्र मंडळाचा गणपती साडेदहा वाजता विसर्जित करण्यात आला. रात्री दीडच्या सुमारास सर्वच बाप्पांना अखेरचा निरोप देण्यात आला. विसर्जन मिरवणूक शांततेमध्ये व निर्विघ्नपणे पार पडावी, याकरिता लोणावळा उपविभागीय पोलीस अधिकारी ज्ञानेश्वर शिवथरे, लोणावळा शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक चंद्रकांत जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली चोख बंदोबस्त होता. मावळचे प्रांताधिकारी सुभाष भागडे, मुख्याधिकारी सचिन पवार यांनी विसर्जन मार्गाची पाहणी करत मंडळांना व स्वागत कक्षांना भेटी दिल्या. विसर्जन घाटावर खास आपत्कालीन पथक म्हणून शिवदुर्ग मित्र या संस्थेचे स्वयंसेवक नेमण्यात आले होते.

राजगुरुनगरवासीयांचा ‘निर्मल भीमा संकल्प’
राजगुरूनगर । येथे अनंत चतुर्दशीला गणरायाला मोठ्या उत्साहात भावपूर्ण निरोप देण्यात आला. यंदाच्या गणेशोत्सवाचे वैशिष्ट्य म्हणजे, राजगुरुनगरवासीयांनी तडीस नेलेला ‘निर्मल भीमा संकल्प’ होय. राजगुरूनगर येथे गणेशोत्सवाच्या शेवटच्या दिवशी घरगुती गणपतींचे आणि सर्व लहान-मोठ्या सार्वजनिक गणेश मंडळांच्या गणेशमूर्तींचे भीमा नदीच्या नाव घाटावर विसर्जन करण्यात आले. राजगुरूनगर नगरपरिषद, रोटरी क्लब ऑफ राजगुरूनगर व रोअरिंग युथ क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने ‘निर्मल भीमा संकल्प’ हा अभिनव उपक्रम राबविण्यात आला. निर्माल्य संकलनासाठी ठिकठिकाणी ट्रॉली ठेवल्या होत्या. तसेच घरगुती गणेशमूर्ती विसर्जनासाठी स्वतंत्र हौद ठेवण्यात आले होते. खेड उपविभागीय पोलीस अधिकारी राम पठारे यांच्या हस्ते या उपक्रमाचा शुभारंभ झाला. याप्रसंगी नगराध्यक्ष बापूसाहेब थिगळे, उपनगराध्यक्ष संदीप सांडभोर, आरोग्य सभापती संपदा सांडभोर, नियोजन सभापती सुरेखा क्षेत्रिय, गणेश देव्हरकर, प्रवीण वायकर, श्रीकांत गुजराथी, गणेश घुमटकर, नरेश हेडा, अविनाश कहाणे, सतीश नाईकरे, अविनाश कोहिणकर, उत्तम कुंभार, माऊली करंडे, दादासाहेब गुंजाळ, राहुल वाळुंज, विठ्ठल सांडभोर, श्रीराज चव्हाण सहकारी उपस्थित होते. सायंकाळपर्यंत सुमारे दोन हजार गणेशमूर्ती व एक टन निर्माल्य संकलित झाल्याचे संयोजकांनी सांगितले. विसर्जन मिरवणूक यंदा सायंकाळी साडेसहाला सुरुवात झाली. मानाचा प्रथम गणपती मोती चौक गणेश मंडळ अग्रस्थानी होता. रात्री बाराच्या सुमारास एकवीरा मंडळाच्या गणेशमूर्तीचे विसर्जन झाले.

तळेगावात शांततेत विसर्जन
तळेगाव दाभाडे । येथे गणेशोत्सवाच्या शेवटच्या दिवशी शांततेत विसर्जन मिरवणुका पार पडल्या. तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या वतीने गावतळे तसेच इंद्रायणी नदीकाठावरील घाट येथे गणेशमूर्तींच्या विसर्जनासाठी कृत्रिम तलाव तयार केले होते. याच ठिकाणी लहान-मोठ्या सार्वजनिक गणेश मंडळांसह घरगुती गणपती मूर्तींचे विसर्जन करण्यात आले. नगरपरिषदेने ‘मूर्तीदान करा’ हा उपक्रमदेखील राबविला. पर्यावरण रक्षणाच्या दृष्टीने तळेगाववासीयांनी या उपक्रमाला मोठा प्रतिसाद दिला. तळेगाव दाभाडे येथील बहुसंख्य सार्वजनिक गणेश मंडळे व घरगुती गणपतींचे सातव्या दिवशीच विसर्जन होते. त्यामुळे शेवटच्या म्हणजेच, अनंत चतुर्दशीला कमी मंडळांकडून विसर्जन केले जाते. इंद्रायणी नदीकाठावरील घाटावर गणेशमूर्तींच्या विसर्जनासाठी गणेशभक्तांची मोठी गर्दी झाली होती. तळेगाव पोलिसांच्या वतीने चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. सर्वत्र विसर्जन मिरवणुका निर्विघ्न पार पडल्या.

शेलपिंपळगावात गणेशभक्तांच्या आनंदाला उधाण
शेलपिंपळगाव । खेड तालुक्याच्या पूर्व भागातील गणेश मंडळांसह घरगुती गणपतींचे अनंत चतुर्दशीला विसर्जन करण्यात आले. शेलपिंपळगाव, वडगाव घेनंद, कोयाळी, बहुळ, चिंचोशी, सिद्धेगव्हाण, साबळेवाडी, दौंडकरवाडी, मोहितेवाडी, मरकळ या गावातील घरच्या गणपतींसह गणेश मंडळांच्या गणेशमूर्तींचे उत्साहात विसर्जन झाले. बर्‍याच मंडळांनी सजविलेल्या वाहनांमधून गणरायाची मिरवणूक काढून भीमा नदीपात्रात विसर्जन केले. तर वाड्या-वस्त्यांवरील गणेशभक्तांनी पारंपरिक पद्धतीने गावातील जवळच्या विहीरींमध्ये विसर्जन केले. दरम्यान, मरकळ येथे दुपारी दीडच्या सुमारास अक्षय सुनील वर्पे (वय 17) हा युवक इंद्रायणी नदीपात्रात बुडाला. या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात एकच शोककळा पसरली. मरकळमधील गणेश मंडळांनी मिरवणूक न काढताच इंद्रायणी नदीत गणेश विसर्जन केले.