बोदवड- तालुक्यातील विचवा गावात सोमवारी रात्री आठ वाजेच्या सुमारास जुन्या भांडणाच्या कारणातून दोन गटात तुफान हाणामारी झाली. भांडणात काठ्या, कुर्हाड, लाठ्यांचा सर्रास वापर करण्यात आला. हाणामारीत दोन्ही गटाचे लोक जखमी झाले असून त्यांना जळगाव येथिल ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले. दोन्ही गटांच्या फिर्यादीनुसार रात्री उशिरा परस्परविरोधी 12 संशयीतांविरुद्ध बोदवड पोलिसात गुन्हे दाखल करण्यात आले.
एका गटाच्या सात जणांविरुद्ध गुन्हा
पहिली तक्रार शंकर मोतीराम तायडे (55) यांनी दिली. त्यांच्या घराजवळ ते सार्वजनिक जागेच्या ठिकाणी उभे असताना मागील भांडणाचा कारणावरून संशयीत आरोपी जितू देवचंद तायडे याने कुर्हाडीने वार केला तर देवचंद अर्जुन तायडे, विजू देवचंद तायडे, श्रावण शिवा तायडे, संतोष श्रावण तायडे, बाळू श्रावण तायडे, बंडू शिवा तायडे यांनी फिर्यादीच्या पत्नीला मारहाण केली. आरोपींविरुद्ध दंगलीचा गुन्हा दाखल करण्यात आला. या गुन्ह्याचा तपास पोलिस निरीक्षक सुनील खरे यांच्या मार्गदर्शनाखाली वसंत निकम हे करीत आहेत.
दुसर्या गटाच्या पाच आरोपींविरुद्ध गुन्हा
दुसर्या गटातर्फे जितू देवचंद तायडे यांनी फिर्याद दिली. घरासमोरील विहिरीजवळ उभे असताना संशयीत आरोपी नागेश शंकर तायडे, योगेश शंकर तायडे, मनोज शंकर तायडे, सिद्धार्थ तायडे, शंकर मोतीराम तायडे यांनी फिर्यादिस लोखंडी सळईने तसेच लाठ्या-काठ्यांनी मारहाण केली त्यात फिर्यादी व विकास श्रावण तायडे हे जखमी झाले असून त्यांच्या डोक्याला व हाताला दुखापत झाली. दोन्ही गटातील जखमी यांना उपचारासाठी जळगाव रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले. या गुन्ह्याचा तपास पोलिस निरीक्षक सुनील खरे यांच्या मार्गदर्शनाखाली उद्दल चौव्हाण करीत आहे.