‘कविर्मनीषी परिभू: स्वयंभू:’ असे अमरकोशाचा कर्ता अमर पंडित याने म्हटले आहे. कवीच्या समानार्थी शब्दासाठी ईश्वर आणि प्रतिसृष्टी असे शब्द ग्रंथकर्त्याने दिले आहेत. इतकेच नाही, तर ईश्वराचे पहिले नाव कवी आहे, असेही तो म्हणतो. यातील अतिशयोक्तीचा भाग वगळला, तरी कवी आणि लेखक यांच्या हातात एक नवीन सृष्टी निर्माण करण्याची शक्ती असते, हे सत्य बाकी उरतेच. आज समाजात लिहित्या-वाचत्या लोकांची संख्या सुदैवाने चांगली आहे. परंतु, त्यांना एकत्र येण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध नाही. त्यामुळे चुकीचे, दिशाभूल करणारे विचार अत्यंत जोरदारपणे मांडले जात आहेत अन् या मतांच्या गलबल्यात अस्सल, या भूमीशी जोडलेले विचार मांडण्यास वाव मिळत नाही. जे मांडतात त्यांच्याही मनात अनेकदा आपल्याच सत्याबद्दल किंतु निर्माण होत असतात.
त्यांची ही साशंकता दूर व्हावी, आपली अभिव्यक्ती अधिक ठाशीव करण्याचा आत्मविश्वास त्यांच्यात यावा तसेच पुढील वाटचालीसाठी विचारधन मिळावे, या उद्देशाने विद्वानांची नगरी पुण्यात विचार भारती साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात येत आहे. भारतीय विचार साधना आणि विश्व संवाद केंद्राच्या वतीने रविवार, 21 मे रोजी हे संमेलन सातारा रस्त्यावरील शाहीर अण्णा भाऊ साठे सभागृहात होणार आहे.
साहित्य संमेलने हे आपल्या महाराष्ट्राचे एक खास वैशिष्ट्य आहे. अखिल भारतीय, प्रादेशिक, प्रांतिक, उपनगरीय, शारदीय. वासंतिक, महिलांची, बाल-कुमारांची, नवोदितांची, होतकरूंची, ग्रामीण, दलित आदी नाना प्रकारची मराठी भाषिकांची साहित्यसंमेलने मोठ्या संख्येने व उत्साहाने होतात. मात्र, हे ‘विचार भारती साहित्य संमेलन’ संमेलनाच्या मांदियाळीत काहीसे वेगळे ठरावे. हे केवळ काही जणांचे एकत्रीकरण नाही. साहित्य-संस्कृतीच्या क्षेत्रात कार्यरत असलेल्यांसाठी ‘विचार भारती’ ही संघटना यानिमित्ताने नव्याने उदयास येत आहे. त्यामुळे राष्ट्रीय भूमिकेतून लेखन किंवा मांडणी करणार्यांना एक हक्काचे व्यासपीठ उपलब्ध होणार आहे, हा त्यातील आनुषंगिक लाभ होईल.
साधारणतः संमेलन म्हटल्यावर येणारे कार्यक्रम याही संमेलनात असतीलच. म्हणजे आचार्य गोविंददेव गिरीमहाराज यांच्या हस्ते त्याचे उद्घाटन होणार असून प्राच्यविद्यासंशोधक डॉ. गो. बं. देगलूरकर यांच्या उपस्थितीत संमेलनाचा समारोप होईल. दिवसभराच्या कार्यक्रमांमध्ये ‘व्यक्ती, समाज आणि साहित्य-परस्पर संबंध’ असा परिसंवाद आहे. प्रा. प्रभाकर पुजारी, प्रा. जयंत कुलकर्णी, शेफाली वैद्य असे नामवंत वक्ते परिसंवादाला लाभले आहेत, तर डॉ. विश्वास मेहेंदळे हे परिसंवादाचे अध्यक्ष असतील. डॉ. संजय उपाध्ये ‘मातृभाषेतून मन:शांती’ या विषयावर बोलणार आहेत. विश्वास गांगुर्डे यांच्या अध्यक्षतेखाली निवडक निमंत्रित कवींचे संमेलन होणार आहे इत्यादी.
आज तरुणांमध्ये क्रेझ असलेले प्रसिद्ध लेखक संदीप वासलेकर हे या संमेलनाच्या निमित्ताने साहित्य रसिकांच्या भेटीस येत आहे. हे संमेलनाचे खास आकर्षक ठरावे. देश-विदेशांतील सत्ताधारी व विद्वानांच्या वर्तुळात वावरलेले वासलेकर सातत्याने माय मराठीत लिहीत असतात. त्यांच्या भविष्यवेधी लिखाणाची तरुण पिढीला आवड आहे. पुणेकरांना यानिमित्ताने त्यांना प्रत्यक्ष पाहण्या-ऐकण्याची व त्यांच्याशी संवाद साधण्याची संधी मिळणार आहे. मात्र, या आयोजनाचे वैशिष्ट्य हे नाही. एकूणच आपला समाज, आपली भूमिका आणि आपली भाषा यावर होणारे विचारमंथन, मतांची देवाणघेवाण हे त्याचे वैशिष्ट्य ठरणार आहे. उदा. ज्येष्ठ शास्त्रज्ञ माधव गाडगीळ ‘मराठी विकिपिडीया : एक लोक चळवळ आणि भाषा समृद्धीचे दालन’ या विषयावर मार्गदर्शन करतील. पर्यावरण आणि जैवविविधता यावर कार्य करणारे तज्ज्ञ म्हणून प्रा. गाडगीळ यांची ओळख आहे. मात्र, तेच माधव गाडगीळ मराठी भाषेत ज्ञान-विज्ञान वाढावे आणि या माहिती युगात मराठी मागे पडू नये, यासाठी हिरिरीने प्रयत्न करत आहेत. त्याची चुणूक या संमेलनात पाहायला मिळणार आहे.
एकुणात मराठीच्या सांस्कृतिक वातावरणात या संमेलनाच्या निमित्ताने एक पुढचे पाऊल पडत आहे. सर्व साहित्य रसिकांनी व स्वदेश-स्वभाषेवर प्रेम करणार्यांनी या संधीचा लाभ घ्यायला हवा. एक पुढचे सांस्कृतिक पाऊल
– देवीदास देशपांडे