राज्यभरातून, देशभरातून येणार्या जनतेला सुविधा मिळाव्यात
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाची पत्रकार परिषदेत मागणी
पुणे : भीमा कोरेगाव येथील ऐतिहासिक विजयस्तंभ व परिसराच्या विकासाचा आराखडा करून शासनाने त्यासाठी 100 कोटींचा निधी द्यावा, अशी मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या (आठवले गट) वतीने पत्रकार परिषदेत करण्यात आली. शौर्य दिन (1 जानेवारी) काही दिवसांवर आला आहे, त्या पार्श्वभूमीवर पक्षाच्या वतीने पत्रकार परिषद आयोजिली होती. पक्षाचे प्रदेश सचिव बाळासाहेब जानराव, युवा आघाडीचे अध्यक्ष परशुराम वाडेकर, कामगार आघाडीचे अध्यक्ष महेश शिंदे, शहर कार्याध्यक्ष बसवराज गायकवाड, उपाध्यक्ष भगवान गायकवाड, तानाजी ताकपेरे, युवक अध्यक्ष शैलेंद्र चव्हाण, सरचिटणीस बाबुराव घाडगे, महिपाल वाघमारे यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते.
निधी मागणीकडे शासनाचे दुर्लक्ष
बाळासाहेब जानराव म्हणाले, विजयस्तंभ परिसराच्या विकासासाठी आंबेडकरी समाजाने अनेकवेळा मागणी केली आहे. मात्र, प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष केले आहे. त्याकडे शासनाने लक्ष द्यावे. त्याचबरोबर भीमा कोरेगाव परिसर लोणीकंद व लोणी काळभोर पोलीस स्टेशन शहर पोलीस मुख्यालयाच्या अखत्यारीत लवकरात लवकर घ्यावे. 1 जानेवारी 2019 रोजी होत असलेल्या शौर्य दिनाला आवश्यक ती सुरक्षाव्यवस्था पुरवावी. गेल्या वर्षी घडलेल्या दंगलीच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी, पोलीस आयुक्त व पोलीस अधीक्षक यांनी सर्व खबरदारी घ्यावी व आवश्यक त्या सोयीसुविधा उपलब्ध करून द्याव्यात. पक्षाच्या वतीने प्रशासनाला आवश्यक ते सहाकार्य केले जाईल.
अफवांवर विश्वास ठेवू नका
परशुराम वाडेकर म्हणाले, सोशल मीडियावरून अफवा पसरविण्याचे प्रकार सुरु आहेत. त्यामुळे आंबेडकरी जनतेने यावर विश्वास ठेवू नये. स्तंभास मानवंदना देण्यासाठी येणार्या बांधवाना सगळ्या सोयी पुरविण्यासाठी आपण सर्वानी एकत्र येऊया. रिपब्लिकन पक्षाच्या वतीने दरवर्षीप्रमाणे स्वयंसेवक, पाणी व अल्पोपाहाराची व्यवस्था केली जाणार आहे. गोंधळ व गडबड होणार नाही, यासाठी प्रशासनाने पावले उचलावीत. त्यांच्यासोबत रिपब्लिकन पक्षाचे कार्यकर्ते सदैव तयार आहेत.
बस सेवा, सुरक्षा कॅमेरे पुरवा
शौर्यदिनाच्या निमित्ताने राज्यभरातून, देशभरातून आंबेडकरी जनता येत असते. त्यांच्या सोयीसाठी पुणे स्टेशनवरून बस सेवा द्यावी. पुणे-नगर रस्त्यावरील वाहतूक पर्यायी मार्गावर वाळवावी. विजयस्तंभ परिसर सीसीटीव्ही कॅमेरात आणावा. 500 मीटर परिसरात कसल्याही प्रकारचे स्टॉल, मंडप, स्पीकर, सभा घेण्यास परवानगी देऊ नये. ऍम्ब्युलन्स, डॉक्टरांचे पथक, पिण्याचे पाणी, वाहनतळ, वीज आदी सुविधा पुरवाव्यात, याही मागण्या बाळासाहेब जानराव यांनी पत्रकार परिषदेत केल्या त्याचे निवेदन प्रशासनाला दिले असल्याचे त्यांनी सांगितले.
विजयस्तंभ परिसराला सुरक्षा द्यावी
महेश शिंदे म्हणाले, भीमा कोरेगाव येथील विजयस्तंभ आपल्या सर्वांसाठी प्रेरणास्रोत आहे. त्याचे संरक्षण झाले पाहिजे. गेल्या वर्षी घडल्या प्रकाराला शासन व प्रशासनच जबाबदार आहे. त्यामुळे गेल्या वर्षीसारखी चूक पुन्हा होणार नाही, याची दक्षता सरकारने व प्रशासनाने घ्यावी. तेथे येणार्या बांधवाना सुरक्षा आणि इतर सुविधा देण्यासाठी व्यवस्था उभारावी. कडेकोट पोलीस बंदोबस्त पुरवावा. तसेच विजयस्तंभाला सुरक्षा द्यावी.