विजयस्तंभ मानवंदना सोहळ्यासाठी प्रशासन सज्ज

0

जिल्हाधिकारी, पोलीस अधिक्षकांचा पाहणी दौरा 

मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवणार

सणसवाडी : एक जानेवारी रोजी होणारा विजयस्तंभ मानवंदना सोहळा शांततेत पार पाडण्यासाठी प्रशासन सज्ज झाले असून या भागामध्ये मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. पुण्याचे जिल्हाधिकारी नवल किशोर राम व पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांच्यासह अधिकार्‍यांनी रणस्तंभ परिसरराला भेट देत पाहणी केली आहे.

कोरेगाव भिमा व पेरणे येथे एक जानेवारी दिनी येणार्‍या समाज बांधवांचे स्वागत करत, होणारा कार्यक्रम शांततेत पार पाडण्यासाठी जिल्हा प्रशासन प्रयत्नशील आहे. सदर कार्यक्रमाचे नियोजन जिल्हा स्तरावरील प्रशासन करत आहे. नवल किशोर राम व संदीप पाटील यांनी पेरणे येथील विजय रणस्तंभ परिसरराला भेट देत पाहणी केली. यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. संदीप पखाले, प्रांताधिकारी भाऊ गलंडे, लोणीकंद पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दीपक मानकर, शिक्रापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सदाशिव शेलार, सहाय्यक पोलीस निरीक्षक मयूर वैरागकर, कोरेगाव भीमा विजय रणस्तंभ सेवा संघाचे अध्यक्ष सर्जेराव वाघमारे, शिरूरचे तहसीलदार रणजीत भोसले, हवेलीचे तहसीलदार सुनील कोळी, पेरणेचे सरपंच रुपेश ठोंबरे, प्रशांत उबाळे, सचिन कडलग, विशाल सोनवणे भाऊदास भालेराव, बाळासाहेब भालेराव यांसह आदी उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या नियोजनाचा आढावा

जिल्हा प्रशासन व कोरेगाव भीमा विजय रणस्तंभ सेवा संघाच्या वतीने होणारा कार्यक्रम शांततेत पार पडवा यासाठी विशेष परिश्रम घेतले जात आहे. पाहणी दौर्‍या दरम्यान वरिष्ठ अधिकार्‍यांच्या वतीने संपूर्ण परिसराची पाहणी करून कार्यक्रमाच्या नियोजनाचा आढावा घेण्यात आला आहे. तसेच विजय रणस्तंभ परिसररात कोठेही सभा व भाषणे करण्यास परवानगी देण्यात आलेली नसून विजय रणस्तंभापासून काही अंतरावर पुणे नगर रस्त्यालगत असलेल्या टोलनाका परिसरात भाषणे व सभा घेण्यात येतील, असे प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले आहे.