भाजप कार्यकर्त्यांनी पुतळ्याचे शीर वेगळे करून लाथाडले
त्रिपुरातील 13 राज्यांत हिंसाचार उफळला
आगरतळा : विधानसभा निवडणुकीत डाव्यांवर मिळवलेल्या ऐतिहासिक विजयानंतर त्रिपुरात भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये विजयाचा उन्माद संचारला होता. या कार्यकर्त्यांनी डाव्यांचा आदर्श असणारा कम्युनिस्ट नेता व्लादिमीर लेनिन याचा बेलोनिया शहराच्या मध्यवर्ती भागातील पुतळा बुलडोझरने पाडला. एवढेच नव्हे तर हा पुतळा पाडल्यानंतर त्याचे शीर वेगळे करून त्याला लाथाडले. या घटनेचे देशासह परदेशातही पडसाद उमटत आहेत. या घटनेनंतर बुलडोझरचा चालक आशीष पाल याला ताब्यात घेण्यात आले होते. मात्र, संध्याकाळी त्याची सुटका करण्यात आली. तसेच पालिकेकडून या पुतळ्याचे अवशेष ताब्यात घेण्यात आले आहेत. या घटनेनंतर त्रिपुरातील 13 राज्यांत जोरदार हिंसाचार उफळून आला होता.
राजनाथ सिंह यांची राज्यपाल, डीजीपींशी चर्चा
त्रिपुरातील ऐतिहासिक विजयानंतर भाजपच्या समर्थकांनी दक्षिण त्रिपुरास्थित बेलोनिया शहरात असलेला व्लादिमीर पुतीन यांचा पुतळा जेसीबीच्या साहाय्याने तोडला. त्याची छायाचित्रे व व्हिडिओ वेगाने सोशल मीडियावर व्हायरल झाला. या पुतळ्याला पाच वर्षापूर्वी बसविण्यात आले होते. या घटनेचा डाव्या पक्षांसह सर्वच राजकीय पक्षांनी तीव्र निषेध केला. सत्ताधारी भाजपनेदेखील हे कृत्य आपल्या समर्थकांचे नसल्याचा दावा केला होता. त्यानंतर तब्बल तेरा जिल्ह्यांत अचानक हिंसाचार उफळून आला. ठिकठिकाणी जाळपोळ व तोडफोड करण्यात येत होती. भाजपच्या कार्यकर्त्यांनी कम्युनिस्ट पक्षाच्या कार्यालयांवर हल्ले केल्याचा दावा डाव्यांनी केला. या हिंसाचारानंतर केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी राज्यपालांसह राज्याच्या पोलिस महासंचालकांशी दूरध्वनीवरून चर्चा केली व कायदा व सुव्यवस्था राखण्याचे आवाहन केले. राज्यात सरकार स्थापण्यासाठी शांतता प्रस्थापित करण्याची सूचनाही राजनाथ यांनी संबंधितांना केली. या हिंसाचारानंतर अनेक जिल्ह्यात संचारबंदी लागू करण्यात आली असून, दंगलखोरांना ताब्यात घेण्याची कारवाई सुरु करण्यात आली होती.
बिप्लबकुमार देब नवे मुख्यमंत्री
दरम्यान, भाजपला यशोशिखराव पोहोचविणारे प्रदेशाध्यक्ष बिप्लबकुमार देब हे त्रिपुराचे मुख्यमंत्री होणार असून, त्यांच्या नावावर पक्षाने शिक्कामोर्तब केले आहे. आगरतळा येथे झालेल्या पक्षाच्या बैठकीत त्यांनी संसदीय नेतेपदी निवड करण्यात आली. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडली. सहयोगी पक्षानेदेखील त्यांच्या नावाला अनुमती दिली असून, भाजपचेच नेते जिष्णु देव वर्मा यांची उपमुख्यमंत्रिपदी वर्णी लागली आहे. नवीन मुख्यमंत्र्यांचा शपथविधी 9 मार्चला सकाळी साडेदहा वाजता होणार आहे. या शपथविधी सोहळ्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपशासित राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना आमंत्रित केले असल्याची माहिती पक्षनिरीक्षक गडकरी यांनी दिली.
सीपीएमकडून हिंसाचाराचा निषेध
पोलिसांच्या माहितीनुसार, जेसीबी चालकास अटक करण्यात आली असून, तो नशेत होता अशी माहिती देण्यात आली आहे. भाजपच्या विजयानंतर कम्युनिस्ट पार्टी (मार्क्सवादी)च्या अनेक कार्यालयांची भाजपच्या समर्थकांनी तोडफोड केली असून, पुतळाकांडानंतर हिंसाचाराचा उद्रेक झालेला आहे. सीपीएमने या हिंसाचाराचा निषेध केला असून, लोकशाहीत अशा घटना अमान्य आहेत, अशी प्रतिक्रिया पक्षाचे नेते डी. राजा यांनी दिली आहे. जय-पराजय हा सुरुच असतो. याचा अर्थ तुम्ही सत्तेवर आल्यानंतर पुतळे पाडावेत असा होत नाही, असेही राजा यांनी भाजपला ठणकावले.