‘विजया’चा पाया रचत ‘विराट’ धावसंख्येकडे वाटचाल

0

हैदराबाद : इंग्लंड आणि न्यूझीलंडला बांगलादेशविरुद्धच्या एकमेव कसोटीच्या पहिल्या दिवशी भारतीय फलंदाजांनी बांगलादेशच्या गोलंदाजांवर हुकुमत राखली. सलामीवीर मुरली विजयपाठोपाठ कर्णधार विराट कोहलीनेही केलेल्या शतकी खेळीच्या जोरावर भारताने पहिल्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत 3 बाद 356 धावा केल्या आहेत. खेळ संपला त्यावेळी विराट कोहली १११ तर संघात स्थान मिळालेला अजिंक्य रहाणे ४५ धावांवर खेळत आहेत. पुजारानेही उत्तम खेळाचे दर्शन देताना ८३ धावांची खेळी केली. मुरली विजय आणि चेतेश्वर पुजारा या आश्वासक समिकरणाने भारतीय संघाला पुन्हा एकदा सावरले. तर कोहलीने कर्णधारी खेळी साकारून आणखी एका शतकी खेळीचा नजराणा पेश केला. भारतीय संघाने सामन्याचा नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला होता.

विजय-पुजाराने दमदार पाया रचला

नाणेफेक जिंकून भारताने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतल्यावर लोकेश राहुलच्या रुपात भारताला पहिल्याच षटकात धक्का बसला. त्यानंतर पुजारा आणि विजयने जबरदस्त खेळी केली. पुजारा ८३ धावांवर बाद झाल्याने त्याचे शतक हुकले. त्यानंतर विजयने आपले शतक पूर्ण केले. हे कसोटी क्रिकेमधील नववे शतक असून, या शतकी खेळीदरम्यान त्याने चेतेश्वर पुजारासोबत दुस-या विकेटसाठी केलेल्या 178 धावांच्या भागीदारीच्या जोरावर भारताचा डाव मजबूत स्थितीत पोहोचला. शतक पूर्ण झाल्यानंतर विजय फारवेळ खेळपट्टीवर उभा राहू शकला नाही आणि 108 धावा काढून बाद झाला. मुरली विजय शतक पटकावून बाद झाल्यानंतर कर्णधार विराट कोहलीने फलंदाजीची सुत्रे आपल्या हाती घेत खेळाच्या तिसऱ्या सत्रात पाहुण्या गोलंदाजांना झोडपून काढले.

विराट कोहलीचे शानदार शतक

निराशाजनक सुरूवातीनंतर मुरली विजय आणि चेतेश्वर पुजारा जोडी पुन्हा एकदा धावून आली. दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी १७८ धावांची भागीदारी रचली. दुसऱ्या सत्रात देखील दोघांनी चांगली फलंदाजी करत संघाला दिडशेचा आकडा गाठून दिला. सामन्याच्या ५१ व्या षटकात फिरकीपटू मेहंदी हसन याने चेतेश्वर पुजाराला(८३) बाद केले. पुजारा बाद झाल्यानंतर विजय देखील बाद झाला. कोहली आणि विजयने छोटीशी भागीदारी केली. यानंतर कोहलीने कर्णधारी कामगिरी करत सामन्यात बांगलादेशच्या गोलंदाजांना पुनरागमनाची कोणतीही संधी दिली नाही. कोहलीने दिवसाच्या तिसऱ्या सत्रात आपले शतक पूर्ण केले. कोहलीचे हे १६ वे आंतरराष्ट्रीय कसोटी शतक ठरले. विराट अगदी वनडे शैलीत खेळताना आपले हे शतक पूर्ण केले. या खेळीत त्याने १२ चौकार ठोकले.

डोंगर उभारण्याची शक्यता

करुण नायरऐवजी संघात स्थान देण्यात आलेल्या अजिंक्य रहाणेने यावेळी कोहलीचा चांगली साथ देत दुसरी बाजू चांगली लावून धरली. दिवसाचा खेळ संपला तेव्हा कोहली नाबाद १११ धावांवर, तर रहाणे ४५ धावांवर नाबाद आहे. सामन्याच्या पहिल्या दिवशी भारतीय संघाचे वर्चस्व दिसून आले असून दुसऱ्या दिवशी देखील भारतीय फलंदाज दमदार फलंदाजी करून बांगलादेशसमोर धावांचा डोंगर उभा करतील अशी आशा आहे. इंग्लंडसारख्या मातब्बर संघावर दमदार विजय मिळवत भारतीय संघाने मायदेशात आम्हाला कुणीही पराभूत करू शकत नाही, हे दाखवून दिले आहे. त्यामुळे बांगलादेशविरुद्धच्या कसोटीत भारताचेच पारडे जड आहे; पण दुसरीकडे बांगलादेशच्या संघाशी सामना करताना गाफील राहून चालणार नाही, कारण काही दिवसांपूर्वीच त्यांनी न्यूझीलंडविरुद्ध विक्रमी धावसंख्या उभारत आपली चमक दाखवली होती. कागदावर बांगलादेशपेक्षा भारत बलाढय दिसत आहे, पण बांगलादेशला कमी लेखण्याची चूक भारतीय संघाला करता येणार नाही. दुसऱ्या दिवशी खेळपट्टीवर स्विंग मिळाल्यास बांगलादेशसाठी पुनरागमनाची संधी ठरू शकते.

रहाणे, साहाकडून विशेष अपेक्षा

बांगलादेशविरूद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात संघात यापूर्वीच्या सामन्यात त्रिशतक झळकाविणाऱ्या करुण नायरसह कुलदीप यादव, अभिनव मुकुंद, हार्दिक पांड्या आणि जयंत यादव यांना राखीव खेळाडू म्हणून ठेवण्यात आले आहे. भारतीय संघामध्ये नायरऐवजी रहाणे आणि पार्थिवऐवजी साहा यांना संधी देण्यात आली आहे. या दोघांशिवाय अन्य पर्याय भारताकडे असल्याने या सामन्यात या दोघांनाही प्रभाव पाडणे गरजेचे आहे. इंग्लंविरूद्धच्या पहिल्या दोन कसोटी सामन्यात रहाणे अपयशी ठरला होता, तर न्यूझीलंडविरूद्ध दुखापत होण्यापूर्वी साहाला लौकिकाप्रमाणे कामगिरी करता आली नव्हती. नायरच्या जागी आलेल्या अजिंक्यने नाबाद ४५ धावांची खेळी करत अजूनतरी विश्वास राखलेला आहे. त्याच्याकडून मोठ्या खेळीची अपेक्षा आहे.