कोलकाता । भारतीय संघ गुरुवारी इडन गार्डनवर होणार्या दुसर्या एकदिवसीय सामन्यात चांगल्या कामगिरीचे सातत्य राखत विजय मिळवण्यासाठी मैदानात उतरेल. पहिल्या एकदिवसीय सामन्यात आघाडीच्या फळीतील फलंदाजांच्या फ्लॉप शोनंतर या सामन्यात भारतीय खेळाडु चांगल्या खेळाबरोबर पाहुण्या कांगारूसमोर मोठे आव्हान उभे करतील अशी आशा आहे. ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांना भारताची नवीन फिरकी गोलंदाजांनी जोेडी कुलदीप यादव आणि युजवेंद्र चहल यांचा सामना करणे कठिण गेले होते. त्यामुळे मालिकेत विजयी आघाडी कायम राखण्यासाठी यजमान संघ कुठलीही ढिलाई करणार नाही. कुलदीप यादवची गोलंदाजी ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांसाठी एक रसह्यमय गोलंदाजी वाटत होती. याशिवाय चहलच्या स्लायडर चेंडूच्या अंदाज बांधणे त्यांना कठिण जात होते. पाहुण्या संघातील फलंदाज फिरकी गोलंदाजांचा सामना करण्यासाठी स्थानिक गोलंदाजांची मदत घेत आहेत. चेन्नईतील सामन्याआधी केरळच्या के के जियॉस आणि स्थानिक क्लब्जमधील आशुतोष शिवराम आणि रुपक गुहा यांच्या फिरकी गोलंदाजीवर ऑस्ट्रेलियन फलंदाजांनी सराव केला होता.
पावसाच्या व्यत्ययामुळे गाजलेल्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात 21 षटकांमध्ये 164 धावाचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाचे चार फलंदाज अवघ्या 35 धावांमध्ये बाद झाले होते. त्यानंतर ग्लेन मॅक्सवेलने फटकेबाजी करत संघाच्या आशा पल्लवित केल्या होत्या. पण चहल आणि यादवने चांगली गोलंदाजी करत डकवर्थ लुईसच्या आधारावर भारताला 26 धावांनी विजय मिळवून दिला. ऑस्ट्रेलियन खेळाडूंसाठी सर्वात मोठा धोका हार्दिक पंड्या आहे.
पंड्याने 5 बाद 87 अशा अडचणीच्या परिस्थितीतून बाहेर काढत 7 बाद 281 अशा सन्मानजनक धावसंख्येवर नेऊन ठेवले होते. पंड्याने पुन्हा एकदा षटकारांची हॅट्ट्रिक ठोकत महेंद्रसिंग धोनीसह (88 चेडूत 79 धावा) सामन्याला कलाटणी देणारी 118 धावांची भागिदारी करताना 66 चेंडूत 83 धावा केल्या होत्या. आयपीएल 2015 नंतर पंड्याचा खेळ बहरत चालला आहे.पिंच हिटरपासून तो आता चांगला फलंदाज झाला आहे.
याशिवाय भारतीय संघाला आवश्यक असलेल्या मध्यमगती गोलंदाजी टाकणारा उपयोगी अष्टपैलू खेळाडु म्हणुन तो पुढे येत आहे. मोठ्या खेळी करण्यासाठी उत्सुक असलेल्या अजिंक्य रहाणे आणि रोहित शर्माकडून चांगल्या सुरूवातीची आशा आहे. तर कर्णधार विराट कोहली पहिल्या सामन्यातील अपयश पुसुन टाकण्याच्या इर्याद्याने मैदानात उतरेल. पावसाचे भाकित वर्तवलेले असल्यामुळे सामन्याची मजा कमी होण्याची शक्यता आहे.
धोनीची पद्मभूषण पुरस्कारसाठी शिफारस
भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीची भारतीय क्रिकेट नियामंक मंडळाने प्रतिष्ठेच्या पद्म भूषण पुरस्कारासाठी शिफारस केली आहे. धोनीने भारतीय क्रिकेटला दिलेले योगदान लक्षात घेऊन त्याच्या नावाची शिफारस करण्यात आली आहे. धोनीच्या नेतृत्वाखाली भारताने 2007 साली टी-20 वर्ल्डकप, 2011 मध्ये 50 षटकांचा क्रिकेट विश्वचषक जिंकला. त्याच्या या कार्याची दखल घेतली. यावर्षीच्या पद्म पुरस्कारासाठी फक्त एमएस धोनीच्या नावाची शिफारस केली आहे. सध्याच्या घडीला धोनीपेक्षा दुसरा कोणी योग्य व्यक्ती नसल्याने त्याच्या नावाची शिफारस करण्यात आली आहे, असे बीसीसीआय पदाधिकार्याने सांगितले.
सामन्यासाठी संघ
भारत : अजिंक्य रहाणे, रोहित शर्मा, विराट कोहली (कर्णधार), मनीष पांडे, केदार जाधव, महेंद्रसिंग धोनी (यष्टीरक्शक), हार्दिक पंड्या, भुवनेश्वरकुमार, कुलदीप यादव, युजवेंद्र चहल, जसप्रित बुमराह
ऑस्ट्रेलिया : डेव्हिड वॉर्नर, पीटर हँड्सकॉम्ब, स्टीव्ह स्मिथ (कर्णधार), ट्रॅविस हेड, ग्लेन मॅक्सवेल, मॅथ्यू वेड (यष्टीरक्शक), मार्कस स्टॉईनस, नाथन कुल्टर नाइल, पॅट कमिंस, जेम्स फॉकनर, अॅडम झंपा.