लंडन । आम्ही आयसीसी चॅम्पियन्स चषक क्रिकेट स्पर्धेतील जेतेपद कायम राखण्याच्या निर्धाराने आलो आहोत, त्याच निर्धाराने आमचा संघ मैदानात उतरत राहील, असे भारतीय कर्णधार विराट कोहलीने सांगितले आहे. यंदा भारताच्या आयसीसी चॅम्पियन्स चषकाची मोहीम दि. 4 जून रोजी होणाऱया पाकिस्तानविरुद्धच्या लढतीने सुरु होणार आहे. इंग्लंडमध्ये दाखल झाल्यानंतर विराटने पत्रकार परिषदेला संबोधित केले. जेतेपद कायम राखायचे असले तरी त्यावरच सर्वस्वी भर देऊन चालणार नाही. मुळात, चॅम्पियन्स चषक स्पर्धा ही एखाद्या विश्वचषकापेक्षा छोटी असल्याने तेथे एखादी चूक देखील महागडी ठरु शकते. जागतिक स्तरावरील आठ दिग्गज संघ या स्पर्धेत खेळत असल्याने प्रत्येक संघाची अर्थातच प्रतिष्ठा पणाला लागलेली असते. त्यामुळे, नैसर्गिक खेळावर भर देणे, हाच उत्तम पर्याय ठरु शकतो, असे विराट यावेळी म्हणाला.
विराटला कमी लेखू नका : हसी
विराट दर्जेदार खेळाडू आहे आणि त्याला कोणत्याही स्पर्धेत कमी लेखणे मोठी चूक ठरेल. इंग्लंडमध्ये विराट पुन्हा मुसंडी मारु शकतो आणि आपला क्लास दाखवून देऊ शकतो’, असे ऑस्ट्रेलियन माजी फलंदाज माईक हसीने सांगितले. आयपीएल व चॅम्पियन्स चषकात मुळात तुलना होऊ शकत नाही. पण, आता संघ वेगळा असेल, वातावरण वेगळे असेल आणि आव्हाने देखील वेगळी असतील. इंग्लंडच्या स्थानिक वातावरणात भारतीय संघाने उत्तम खेळ साकारला आहे. त्यामुळे, यंदा ते देखील फेवरीट असतील’, असे तो म्हणाला. ‘बर्मिंगहम, कार्डिफ व ओव्हल येथे फिरकीपटूंसाठी पोषक, अनुकूल स्थिती असू शकते. आता प्रत्यक्षात या स्पर्धेसाठी तयार केल्या गेलेल्या खेळपट्टया मी पाहिलेल्या नाहीत. पण, त्यांचे स्वरुप कोरडे असेल तर फिरकीपटू अर्थातच लक्षवेधी योगदान देऊ शकतात’, असे हसीने सांगितले.