कोलंबो । भारतीय संघाने निदहास ट्रॉफीमध्ये गुरुवारी बांगलादेशला हरवले. मात्र, या विजयानंतरही कर्णधार रोहित शर्मा नाराज आहे. सामन्यातील संघाच्या फिल्डिंगवर रोहितने नाराजी व्यक्त केलीये. त्याच्या मते संघाने फिल्डिंगमध्ये सुधारणा करणे अत्यंत गरजेचे आहे. आर. प्रेमदासा स्टेडियमध्ये खेळवण्यात आलेल्या या सामन्यात भारताने बांगलादेशला 6 विकेट राखून हरवले. बांगलादेशने पहिल्यांदा फलंदाजी करताना 20 षटकांत 8 विकेटच्या मोबदल्यात 139 धावा केल्या होत्या. त्यानंतर शिखर धवनच्या 55 धावांच्या जोरावर भारताने चार विकेट गमावत 140 धावा केल्या आणि विजय मिळवला.
फिल्डिंगमध्ये सुधारणा गरजेची
सामन्यानंतर रोहित म्हणाला, आमची कामगिरी चांगली झाली. याच कामगिरीची आमच्याकडून अपेक्षा होती. श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात झालेल्या चुकातून आम्ही शिकलो. गोलंदाजांनी आखलेल्या योजना प्रत्यक्षात आणल्या. आम्ही आमच्यापरीने चांगला खेळ केला. मात्र, फिल्डिंगमध्ये चुका झाल्या. आम्हाला कॅच सोडण्याच्या चुका सुधारल्या पाहिजेत. प्रत्येक सामन्यागणिक फिल्डिंगमध्ये सुधारणा करावी लागेल.