मुंबई । प्रख्यात सिने आणि नाट्य दिग्दर्शिका विजया मेहता यांना महिंद्रा थिएटर एक्सलन्स अॅवॉर्ड (मेटा) 2018 सोहळ्यामध्ये जीवनगौरव पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे. विजया मेहता या नामवंत दिग्दर्शिका असून, त्या 1960च्या दशकातील प्रायोगिक रंगभूमीवरील एक महत्त्वाचे नाव आहे. रंगायन या नाट्य कला अकादमीची स्थापना त्यांनी केलेली आहे. यापूर्वी कै. जोहरा सहगल, कै. बादल सरकार, कै. खालेद चौधरी, इब्राहीम अल्काझी, गिरीश कर्नाड, कै. एच. कन्हैयालाल, रतन थियम आणि अरुण काकडे यांना मेटा जीवनगौरव पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे.
दिल्लीत होणार कार्यक्रम
मेटा 2018 सोहळा येत्या 13 एप्रिल ते 18 एप्रिल या कालावधीमध्ये नवी दिल्ली येथील कमानी प्रेक्षागृह आणि श्रीराम सेंटर येथे आयोजित करण्यात आला आहे. परीक्षक मंडळ तसेच दिल्लीतील नाट्यरसिकांनी निवडलेले आणि नामांकन मिळालेले 10 नाट्यप्रयोग यावेळी सादर होणार आहेत. या नाट्य महोत्सवात सर्वोत्तम नाटक, सर्वोत्तम दिग्दर्शक, सर्वोत्तम रंगमंच, सर्वोत्तम रंगभूषा, उत्कृष्ट अभिनेतासह, अभिनेत्री, सहअभिनेता व सहअभिनेत्री पुरस्कार देण्यात येणार आहेत.
‘मेटा’ सोहळ्याचे 13वे वर्ष
मेटा सोहळ्याचे हे 13वे वर्ष असून यंदा परीक्षक मंडळामध्ये नाट्य आणि चित्रपट क्षेत्रातील दिग्गज मंडळींचा समावेश आहे. सुप्रसिद्ध नाट्यदिग्दर्शक आणि राष्ट्रीय कला अकादमी ‘एनएसडी’च्या माजी संचालिका अमल अल्लानाए, लोकप्रिय चित्रपट आणि नाट्य अभिनेत्री लिलीएट दुबे, नाट्य दिग्दर्शिका नीलम मानसिंग चौधरी, चित्रपट निर्माते, अभिनेते, लेखक आणि नाट्य दिग्दर्शक रजत कपूर, नामवंत छायाचित्रकार, शास्त्रीय नृत्यकलाकार आणि शाम भारतीय कला केंद्राच्या संचालिका शोभा दीपक सिंग यांनी यंदा मेटा पुरस्कारांसाठी परीक्षक म्हणून काम पाहिले.