विजय ठरवणारी वाढ!

0

लोकशाही ही बहुमताची व्यवस्था असते, याचा अर्थ कधीही असा नसतो की बहुसंख्यांना पाहिजे असलेल्या व्यक्ती, विचार, संस्था सत्तेत येतात. बहुतेकवेळा होते असे की ज्यांची मते मिळवून सत्ता मिळवली जाते त्यांचा टक्का आणि ज्यांनी त्यांना मतेच दिलेली नसतात किंवा थेट विरोधातही मते दिलेली असतात त्यांचा टक्का यात भलतीच तफावत असते. ही तफावत असते अगदी विचित्र वाटावी अशी. 2014 च्या लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पार्टीने जेव्हा अभूतपूर्व असे यश मिळवले तेव्हाही त्यांना मिळालेली मते ही एकूण मतदानाच्या फक्त 31 टक्के होती, अगदी राष्ट्रीय लोकशाही आघाडीची मते मिळवली तरीही 38.5% मतदारांनी साथ दिली होती, तर 61.5% मतदार विरोधात होते. हे केव्हा घडले जेव्हा तब्बल 66.38% भारतीय मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला तेव्हा! लक्षात घ्या, हेच मतदान जेव्हा कमी होते तेव्हा सत्ताधारी पक्षाला असलेला कौल तेवढाच कमी होत असतो.

आजच्या मतदानाला तसे विधानसभेची सेमिफायनल म्हणता येईल. मुंबई, नागपूर, ठाणे, उल्हासनगर, पुणे, पिंपरी-चिंचवड, सोलापूर, नाशिक, अकोला, अमरावती या महानगरपालिकांमध्ये आज मतदान झाले. महानगरांच्या जोडीला रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, अमरावती, गडचिरोली या जिल्हापरिषदांमध्येही ग्रामीण मतदारांनी आजच कौल नोंदवला तसेच वर्धा, यवतमाळ या दोन जिल्ह्यांमधील काही जागांसाठीही आज मतदान झाले. जिल्हा परिषदेच्या 654 जागांसाठी 2 हजार 956, तर पंचायत समित्यांच्या 1 हजार 288 जागांसाठी 5 हजार 167 उमेदवारांमध्ये लढत रंगली.राज्यात सर्वाधिक उमेदवार मुंबई महापालिकेच्या निवडणूक रिंगणात आहेत. मुंबईतील 227 जागांसाठी तब्बल 2,275 उमेदवार रिंगणात उतरले होते. राज्यातील सर्व निवडणुका एका बाजूला आणि मुंबई, पुणे, पिंपरी-चिंचवड, नागपूर एका बाजूला अशी प्रचार, माध्यमांमधील बातम्या, चर्चा अशी स्थिती होती. या महानगरातील मतदारांनीही नेहमीपेक्षा जास्त उत्साह दाखवत कौल नोंदवला आहे.

वाढलेले मतदान हे लोकशाहीसाठी चांगले. कारण आता जे निवडून येतील त्यांना पूर्वीपेक्षा जास्त मतदारांचा कौल असेल तसेच लोकशाहीत अगदी आपल्या पद्धतीला बहुमताची लोकशाही म्हणून काही हिणवत जरी असले, तरी मतदारांचा वाढता सहभाग हा लोकशाही बळकट करण्यासाठी खूपच चांगला आहे. लोकांनी स्वत:ची नावे मतदारयादीत नोंदवणे, नोंदवल्यानंतर ती पडताळून पाहणे, पुन्हा मतदानाच्या दिवशी सुटीचा मोह टाळत हक्कानं आपले मतदानाचे कर्तव्य बजावणे, ही प्रक्रिया लोकशाहीसाठी खूपच आवश्यक. नेमके तसे घडू लागले आहे. त्यामुळे आनंद व्यक्त केलाच पाहिजे. मात्र, त्याचवेळी सकाळपासून घडलेल्या मतदारांची नावे मोठ्या प्रमाणावर गायब होण्याच्या, एकाच घरातील मतदारांची दोन प्रभागांमध्ये, दोन वेगळ्या केंद्रांवर नावे असणे, हे सारे घोळ तसे संशयास्पदही! एखाद्या शायना एनसीसाठी निवडणूक आयोगाची यंत्रणा तत्परतेने हलते. मात्र, सामान्य मतदारांना आयोगाच्या चुकीमुळे हक्क गमवावाच लागतो, हे योग्य नाही. यासाठी जबाबदार असणार्‍यांवर कारवाई आवश्यकच!

एकीकडे वाढलेल्या मतदानाचा आनंद व्यक्त करताना, आणखी एक मुद्दा असा की, गेल्या निवडणुकीपेक्षा या निवडणुकीत कमी झालेल्या अकरा लाख मुंबईकर मतदारांचा! हे मतदार आले कुठून होते आणि मग गेले कुठे हे वेगळेच प्रश्‍न. मात्र, निवडणूक आयोगाच्या तपासणीनुसार एकतर ते नव्हतेच किंवा असले तर दुहेरी नावे नोंद असलेले होते. याचा अर्थ हे मतदार बहुतांशी मतदानालाही उतरत नसावेत. कारण कितीही कोणीही बोगस व्होटिंग करायचे ठरवले, तरीही अकरा लाख मतदान बोगस होऊ शकत नाही. याचा अर्थ स्पष्ट आहे की हे मतदान होतच नव्हते. म्हणजेच पूर्वी जेव्हा यावेळेपेक्षा कमी मतदान दिसत होते तेव्हा या अस्तित्वात नसलेल्या मतदारांचाही त्या मतदान न करणार्‍या 50-55% मतदारांमध्ये समावेश होता. आता हे मतदान न करणारे मतदार कमी झाल्याने तर मतदान करणार्‍या मतदारांची टक्केवारी वाढलेली नाही? हाही वेगळा शोधाचा विषय ठरू शकेल. अर्थात हे येणार्‍या काही दिवसांमध्ये शोधानंतरच स्पष्ट होईल. आताच नेमका कौल कुणाला त्यावर चर्चा रंगवत एक दिवस काढू व 23ला मतदारांच्या कौलावर सरळ-स्पष्ट चर्चा करता येईल. तोपर्यंत किमान वाढलेल्या मतदानाचा आनंद तर साजरा करू या!

अर्थात आता वाढलेल्या मतदारांचा हा कौल नेमका कुणाला यावर आता हा 23 फेब्रुवारीला मतमोजणी सुरू होईपर्यंत चर्चा रंगत राहील. वाढलेल्या मतांच्या टक्क्यात ज्या पक्षाच्या मतदारांची संख्या जास्त असेल त्या पक्षाच्या बाजूने विजयाचा काटा झुकलेला दिसेल.