विजय मल्ल्याला ताब्यात मिळवण्यासाठी मोदी मैदानात

0

हॅम्बर्ग – भारतातील बँकांचे 9 हजार कोटींचे कर्ज बुडवून ब्रिटनला पळालेल्या विजय मल्ल्याला भारताच्या ताब्यात मिळविण्यासाठी खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदीच आता मैदानात उतरले असल्याचे दिसते. जर्मनीतल्या हॅम्बर्गमध्ये आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ब्रिटनच्या पंतप्रधान थेरेसा मे यांची भेट घेत भारतात आर्थिक गुन्हेगारी करून ब्रिटनमध्ये लपलेल्या गुन्हेगारांचे प्रत्यार्पण जलदगतीने करण्यासंबंधि चर्चा केली. या चर्चेतून खरेच काही साध्य होणार असेल तर त्याची सुरुवात ब्रिटनला पळालेल्या विजय मल्ल्याच्या प्रत्यार्पण कारवाईत होऊ शकते अशी चिन्हे निर्माण झाली आहेत.

भारतातील प्रमुख संस्था असलेल्या सीबीआय आणि ईडीकडून विजय मल्ल्याच्या प्रत्यार्पणासाठी प्रयत्न सुरू आहेतच त्याचबरोबर अन्य गुन्हेगारही भारताच्या ताब्यात यासाठी प्रयत्न सुरु आहेत. मात्र आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही आर्थिक गुन्हेगारी करून विदेशात पळणार्‍या गुन्हेगार आणि कर्जबुडव्यांना भारतात आणण्याबाबत जोरकसपणे प्रयत्न केल्याचे दिसून येते. त्यामुळे तूर्त तरी विजय मल्ल्या आणि त्याच्यासारख्या आर्थिक गुन्हे करणार्‍यांना भारतात आणता येण्याचा मार्ग मोकळा होईल, अशी चिन्हे आहेत.