विजय मल्ल्याला लंडनमध्ये अटक

0

नवी दिल्ली : मद्यसम्राट, कर्जबुडव्या विजय मल्ल्याला मंगळवारी स्कॉटलंड यार्ड पोलिसांनी भारताच्या प्रत्यार्पण मागणीवरून अटक केली. अटकेनंतर मल्ल्याला येथील वेस्टमिन्सटर न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने जामीन मंजूर केल्याने मल्ल्याची तीन तासातच जामीनावर सुटका झाली. मल्ल्याने भारतातील बँकांचे 9 हजार कोटी बुडवून लंडनला पलायन केले आहे. त्यास अटक केल्याची माहिती ब्रीटीश अधिकार्‍यांनी सीबीआयला दिली.

9 हजार कोटींना चुना
भारतातील बँकांना 9 हजार कोटी रूपयांचा चुना लावून लंडन येथे पळून गेलेला मद्यसम्राट विजय मल्ल्याविरूध्द काही दिवसांपूर्वीच दिल्लीतील विशेष न्यायालयाने अजामीनपात्र वॉरंट काढले होते. परकीय चलन नियमन कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी हे वॉरंट काढण्यात आले होते. कर्जबुडव्या विजय मल्ल्याने 2016 मध्ये ब्रिटनमध्ये पळ काढला होता. मल्ल्याला पुन्हा भारतात आणण्यासाठी केंद्र सरकारचे प्रयत्न सुरु होते. फेब्रुवारी 2017 मध्ये भारताने ब्रिटिश सरकारकडे मल्ल्याला भारताकडे सोपवावे, अशी विनंती केली होती. विजय मल्ल्याविरोधात एक हजार पानांचे आरोपपत्रही दाखल केले होते. तसेच केंद्र सरकारने विजय मल्ल्याचा पासपोर्टही रद्द केला होता.

भारतीय मीडिया उतावीळ
लंडन आणि भारतातील प्रत्यार्पण करारानुसार भारताने विजय मल्ल्याचे प्रत्यार्पण करण्याची मागणी केली होती. या मागणीनुसार विजय मल्ल्याला लंडन पोलिसांनी मंगळवारी अटक केली. विजय मल्ल्याचे प्रत्यार्पण केल्यानंतर त्याच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा शब्द भारताने दिल्यानंतर ही कारवाई केली आहे. दरम्यान, प्रत्यार्पणाबाबतची सुनावणी आजपासून सुरू होणे अपेक्षित होते. मात्र, भारतीय मीडियाने याबाबतचे वृत्त देताना नेहमीप्रमाणे उतावीळपणाचे प्रदर्शन केले, असे ट्विट कर्जबुडवा उद्योगपती मल्ल्याने केले आहे.

मल्ल्या फरार घोषित
विजय मल्ल्यावर मनी लॉन्ड्रिंग आणि बँकांना 9000 कोटींपेक्षा जास्त रुपये थकवल्याचा आरोप आहे. इन्फोर्समेंट डायरेक्ट्रेट (ईडी) आणि सीबीआय मल्ल्याचा शोध घेत आहे. प्रिव्हेन्शन ऑफ मनी लॉन्ड्रिंग अ‍ॅक्टशी संबंधित एका प्रकरणात मुंबईतील स्पेशल कोर्टने मल्ल्याला फरार घोषित केले आहे. याबाबत ईडीने कोर्टात याचिका दाखल केली आहे.