विजय रूपाणींनी घेतली मुख्यमंत्रिपदाची शपथ

0

पटेल, पाटीदार समाजाचे 8 मंत्री

गांधीनगर : गुजरातमध्ये भाजपच्या नव्या सरकारचा शपथविधी सोहळा मंगळवारी पार पडला. विजय रूपाणी (61) यांनी दुसर्‍यांदा मुख्यमंत्रिपदाची तर नितीन पटेल यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. पटेल-पाटीदार समाजातील 8 नेत्यांनी मंत्रिपदाची शपथ देण्यात आली. या शपथविधीला प्रथमच 18 राज्यांचे मुख्यमंत्री उपस्थित होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह भाजपाध्यक्ष अमित शहा, अनेक केंद्रीय मंत्री, साधु-संत आणि 4 हजार व्हीव्हीआयपी सोहळ्याला उपस्थित होते.

मंत्रिमंडळात एक मराठी मंत्री
मुख्यमंत्री रूपाणी (61) आणि उपमुख्यमंत्री नितीन पटेल यांच्यासह 20 मंत्र्यांनी या सोहळ्यात शपथ घेतली. रुपाणींशिवाय 19 मंत्र्यांपैकी 9 कॅबिनेट तर 10 राज्यमंत्री आहेत. दक्षिण गुजरातमधून 5 आणि कच्छ-सौराष्ट्रमधील 7 मंत्री आहेत. पाच पटेल समाजाचे मंत्री आहेत. आनंदीबेन पटेलांना हटवल्यानंतर 2016 मध्ये रुपाणी मुख्यमंत्री बनले तेव्हा त्यांच्या मंत्रिमंडळात 25 मंत्री होते. त्यावेळी 9 मंत्र्यांची हकालपट्टी करण्यात आली होती. वलसाडमधील अनुसूचित जमातीसाठी राखीव असलेल्या उंबरगाव मतदारसंघातून निवडून आलेले रमणलाल पाटकर यांनीही मंत्रिपदाची शपथ घेतली. पाटकर हे गुजरातच्या मंत्रिमंडळातील एकमेव मराठी मंत्री आहेत.