विजय वडेट्टीवारांची नाराजी कायम; अजूनही नावापुढे मंत्रीपदाचा उल्लेख नाही !

0

मुंबई: माजी विरोधी पक्षनेते तसेच कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांनी महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये कॅबिनेटमंत्री पदाची शपथ घेतली आहे. त्यांना ओबीसी, व्हीजेएनती, भूकंप पुनवर्सन विभाग खात्याचे पदभार देण्यात आले आहे. हे दुय्यम खाते असून या खात्यावर ते समाधानी नाही. खातेवाटपानंतर आज होणाऱ्या महाविकास आघाडीच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत देखील ते उपस्थित राहणार नाही अशी चर्चा आहे. दुय्यम दर्जाचे खाते मिळाल्याने ते नाराज असल्याचे त्यांच्या ट्वीटरवरून देखील उघड होते. कारण त्यांनी अद्याप आपल्या नावापुढे मंत्रीपदाचा उल्लेख केलेला नाही. महाविकास आघाडीच्या सर्व मंत्र्यांनी आपल्या ट्वीटर बायोमध्ये मंत्रीपदाचा उल्लेख केला आहे. तो उल्लेख विजय वडेट्टीवारांनी अद्याप तरी केलेला नाही. तसेच खातेवाटप झाल्यानंतरही त्यांनी पदभार स्वीकारलेला नाही.

विजय वडेट्टीवार हे कॉंग्रेसचे मोठे नेते मानले जातात. व्ही.के.पाटील भाजपात गेल्यानंतर त्यांनी विरोधी पक्षनेत्याची जबाबदारी पार पाडली होती. आता ते नाराज असल्याने त्यांना भाजपकडून पक्षात घेण्याची हालचाली देखील सुरु झाल्याची दिसून येते. भाजपचे माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विजय वडेट्टीवार भाजपात आल्यास पक्षाला त्याचा फायदाच होईल असे सांगून त्यांना अप्रत्यक्षपणे भाजपात येण्याचे निमंत्रणच दिले आहे.