विजय शिवतारेंची बापटांवर घणाघाती टीका

0

पुणे : “पालकमंत्री गिरीश बापट यांनी मेट्रोच्या भूमिपूजन कार्यक्रमात हीन राजकारण केले. मी पुण्यातला मंत्री असूनही मला यातून वगळले. त्यांना सत्तेचा उन्माद आणि गुर्मी आली आहे”, अशी जोरदार टीका जलसंपदा राज्यमंत्री व शिवसेनेचे नेते विजय शिवतारे यांनी सोमवारी केली. पालकमंत्री गिरीश बापट यांची मस्ती उतरवल्यासाठी मी स्वतः पुण्याच्या निवडणुकीच्या राजकारणात उतरणार आहे, असा इशाराही शिवतारे यांनी दिला. कात्रजमध्ये शिवतारे यांनी सोमवारी पत्रकारांशी अनौपचारिक संवाद साधला. त्यात त्यांनी बापट यांच्यावर कडाडून टीका केली. बापट मुख्यमंत्र्यांची दिशाभूल करतात, असा आरोपही शिवतारे यांनी केला.

बापट उर्मट आहेत
पुणे महापालिकेतील तीन प्रभाग माझ्या पुरंदर विधानसभा मतदारंसघात आहेत. त्या अर्थाने मी पुण्याचाही प्रतिनिधी आहे. पुणे महापालिकेच्या कार्यक्रमांमध्ये राज्यमंत्री म्हणून माझे नाव असते. मेट्रोच्याच कार्यक्रमात मला कसे डावलले? असा प्रश्‍न त्यांनी केला. या प्रकाराबाबत मी चौकशी केली तेव्हा मुख्यमंत्री कार्यालयापासून जिल्हाधिकार्‍यांपर्यंत सर्वांनी मला सांगितले, की पालमंत्र्यांनीच नावांबाबत निर्णय घेतला आहे.

मुख्यमंत्री सर्वांशी समन्वय साधून राज्यात काम करत आहेत. ते माझे नाव टाळणार नाहीत. परंतु, पालकमंत्री बापट हा उर्मट आणि गुर्मी असलेला माणूस आहे. त्यांनीच माझे नाव टाळले. संसदीय कामकाजमंत्री आणि चार वेळा निवडून आलेल्या व्यक्तीस राजसिष्टाचार माहिती नाही, असे केस म्हणता येईल? त्यांनी माझे नाव हेतूतः वगळले आहे. शिवतारे आपले पितळ उघडे करेल, अशी भीती त्यांना वाटली. त्यांचे काय धंदे चालू आहेत ते मला माहिती आहे, असा दावाही शिवतारे यांनी केला. बारामतीतील नेत्यांना माझी झलक दाखवली आहे. तशीच झलक पुण्यात मी बापट यांनाही दाखवून देईन., असा इशारा देऊन शिवतारे म्हणाले, की पुण्याच्या निवडणुकीत मी ताकदीने उतरणार आहे. शिवसेना बापट यांची मस्ती उतरवेल, असा इशाराही त्यांनी दिला.