विजवितरण अधिकार्‍यांच्या हिटलरशाहीमुळे शेतकरी त्रस्त

0

बळसाणे। साक्री तालुक्यातील बळसाणे सह माळमाथा परिसरात कांदालागवडीस वेग आला असताीना विजेच्या अघोषित भारनियमनामुळे कांदा लागवड खोळंबली आहे. शेतात भारनियमन केव्हाही करण्यात येत असल्याने एक दिवसात होणार्‍या कांदा लागवडीस चार – चार दिवस लागतात. याकारणाने माळमाथा परिसराचा शेतकर्‍यांना वाढीव मजुरीचा भुर्दंड शेतकर्‍याच्या माथ्यावर पडत आहे. महागाईची कांदा रोपे विकत घेऊन शेतकरी वर्ग कांदा लागवड करीत आहेत. मात्र दिवसभरात विजेचे भारनियमन व त्यानंतर खंडित होणारा विद्युत पुरवठा त्यामुळे कांदा लागवड बंद होते. मजुरवर्गच्या हातात काम नसल्याने शेतातच बसून राहतात. बळसाणेसह परिसरात दोनशे ते अडीचशे प्रतिदिन असा मजुरांचा दर आहे. कांदा लागवडीचे काम खोळंबले तरी देखील एका मजुरास दिवसाची मजुरी मोजावी लागत आहे.

सेनेचा आंदोलनाचा इशारा
यामुळे माळमाथा परिसरातील शेतकरी वर्ग मेटाकुटीला आला आहे. त्यात भर म्हणजे शेतकर्‍यांनी वीज वितरण कंपनीच्या कर्मचार्‍यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला तर त्यावेळात कर्मचारी दिसेनासे होतात. सध्याच्या परिस्थितीत पिक सध्या पाणी देण्याच्या अवस्थेत आहेत. मात्र पुर्णक्षमतेने विजपुरवठा होत नसल्याने शेतकर्‍यांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. विजेच्या कधी भारनियमन तर कधी विविध कारणांनी माळमाथातील पीके संकटात आली आहेत. बळसाणेसह परिसराचे ग्रामस्थ कमालीचे वैतागले असून या भारनियमनाला आळा घालावा अशी मागणी होत आहे. विजवितरण कंपनीच्या हिटलरशाही कारभाराला कंटाळून ग्रामस्थांनी शेतकर्‍यांसह आंदोलनाचा इशारा दिला आहे.

वीजपुरवठ्याची वेळ रात्री असते मग शेतकरी काय रात्री लावतील का कांदालागवड? शेतीसाठी दिवसा 12 तास वीजपुरवठा करू अशी हमी शासनाने दिली होती काही दिवसातच या निर्णयाला विजवितरण कंपनीने बगल दिली आहे त्यामुळे शासनाने शेतकरी हितासाठी दिलेले आश्वासने प्रत्यक्षात पाळून शेतकर्‍यांना दिलासा द्यावा.
महावीर जैन, शिवसेना उपविभाग प्रमुख , बळसाणे