विजांच्या तांडवात पाचोर्‍याला पावसाचे थैमान; जळगाव-पाचोरा वाहतुक पुन्हा ठप्प

जळगाव : पाचोरा-जळगाव मार्गावरील वडली गावाजवळील पुलाचा भराव शनिवारी सकाळी झालेल्या मुसळधार पावसामुळे पुन्हा वाहून गेल्याने या मार्गावरील वाहतूक पुन्हा एकदा ठप्प झाली आहे. गत आठवड्यातही याच पुलाचा भराव वाहून गेला होता. या पुलाचे बांधकाम अत्यंत संथ गतीने सुरु असल्याने आठ दिवसाच्या आत दोन वेळा वाहतुक ठप्प होवून त्याचा त्रास प्रवाशांना करावा लागत आहे.
शनिवारी प्रचंड विजांच्या तांडवात मुसळधार पावसाने पाचोरा शहरास परिसराला झोडपून काढले. शिवाय गोराडखेडा, सामनेर, नांद्रा, वडली आदी परिसरातही पावसाने जोरदार हजेरी लावली. पाचोरा शहरात पहाटे पाच वाजेपासून सकाळी ७.३० वाजेपर्यंत पावसाचा जोर कायम होता. गत आठवड्यात झालेल्या पावसापेक्षाही यावेळी पावसाचा जोर जास्त दिसून आला. यामुळे शहरासह तालुक्यातील नदी, नाले वाहून निघाले. परिसरात झालेल्या मुसळधार पावसामुळे वडली ते वावडदा महामार्गावरील पुलाचा भराव एकाच आठवड्यात सलग दुसर्‍यांदा वाहून गेल्याने वाहतुकीला मोठा फटका बसला. पहाटेपासून उशिरापर्यंत या पुलावरुन पाणी वाहत होते. यामुळे दोन्ही बाजूंनी वाहतुक थांबविण्यात आली आहे. सकाळी ११ वाजेपर्यंतही पाण्याचा जोर कायम असल्याने वाहनधारकांनी अन्य पर्यायी मार्गाचा वापर करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

पुलाचे काम संध गतीने

जळगाव ते पाचोरा दरम्यानच्या महामार्गावरील सर्वच पुलांचे काम पूर्ण झाले आहे. मात्र वडली जवळील या पुलाचे काम दोन वर्षांपासून अत्यंत संथ गतीने सुरु आहे. पुलाचे काम सुरु असतांना बाजूला मातीचा कच्चा भराव टाकून वाहतूकीसाठी मार्ग करण्यात आला आहे. मात्र पावसाळ्यात मातीमुळे येथे प्रचंड चिखल होवून वाहने मातीत फसण्याच्या घटना नेहमीच होत असतात. दरम्यान गेल्या आठवड्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे हा मातीचा भराव वाहून गेला होता. सुदैवाने त्यावेळी पुलावर कोणतेही वाहन नसल्याने अनुचित घटना घडली नव्हती मात्र १८ ते २० तासांपर्यंत वाहतुक ठप्प झाली होती. एसटीसह अन्य वाहने नेरी मार्गे जळगाव पर्यंत नेण्यात आली. त्यानंतर पुन्हा मातीचा भराव टाकून रस्ता खुला करण्यात आला. आता शनिवारी सकाळी झालेल्या पावसामुळे हा भराव पुन्हा एकदा वाहून गेल्याने वाहतुक ठप्प झाली आहे. प्रशासनाने या विषयाकडे गाभीर्यांने लक्ष देण्याची आवश्यकता आहे.