वाहनासह 5 लाख 50 हजाराचा मुद्देमाल ताब्यात
वनविभागाची लागोपाठ दुसरी कारवाई
नवापूर : तालुक्यातील लहान चिंचपाडाजवळील विजापूर येथील नसीब वार्या कोकणी यांच्या घरात अवैधरित्या साग चौपाटच्या 29 नगासह झायलो (क्र.जीजे 6.झेड 1048) हे वाहन घराजवळ आढळून आले होते. त्यात 4 सागाचे चौपाट नग असल्याची गोपनिय माहिती वनविभागाला मिळाली होती. त्यावरुन नवापूरचे वनक्षेत्रपाल प्रथमेश हाडपे तसेच वनक्षेत्रातील वनपाल डी.के.जाधव, पी.बी.मावची, वनरक्षक सतीश पदमोर, रामदास पावरा, संगिता खैरनार, नंदकुमार थोरात, संतोष गायकवाड, संजय बडगुजर, माजी सैनिक काशे, वाहन चालक भगवान साळवे व वनमजूर यांच्यासह शासकीय वाहनाने शुक्रवारी, 26 रोजी सकाळी 11 वाजता घटनास्थळी जाऊन प्रत्यक्ष कारवाई केली. वाहनासह 5 लाख 50 हजाराचा मुद्देमाल जमा करण्यात आला आहे. यातील आरोपी फरार असून तपास सुरु आहे. दरम्यान, नवापूर वनविभागाची ही लागोपाठ दुसरी कारवाई असल्याने लाकुड तस्करांचे चांगलेच धाबे दणाणले आहे.
गोपनिय माहिती मिळाल्यावरुन संपुर्ण मुद्देमाल वाहनासह जप्त करुन वाहन बंदस्थितीत असल्याने खासगी वाहनाने नवापूर येथे शासकीय विक्री आगारात आणण्यात आले.
ही कारवाई उपवनसंरक्षक नंदुरबार वनविभाग, शहादा व उपवनसंरक्षक दक्षता पथक धुळे तसेच सहायक वनसंरक्षक (प्रा.व वन्यजीव) नंदुरबार यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
वनक्षेत्रपाल प्रथमेश हडपे यांच्यासह पथक रोज गस्त घालून लाकुड तस्करांवर नजर ठेवून आहेत. त्यामुळे लाकुड तस्करीवर आळा बसला आहे. लाकुड तस्कर ‘सळो की पळो’ झाल्याची अवस्था झाल्याचे चित्र आहे. रात्र-अपरात्री अशीच गस्त घालून लाकुड तस्करांवर यापुढे ही कारवाई सुरुच राहणार असल्याचे वनविभागाकडून सांगण्यात आले.
Prev Post