विजेअभावी पिके करपली

0

खेड । अखंडीतपणे विद्युत रोहित्राचा होणारा बिघाड आणि विद्युत मंडळाच्या गैरकारभारामुळे सातत्याने खंडीत होणारा विद्युत पुरवठा, यामुळे या भागातील शेतकरी वैतागला आहे. दरम्यान, भामा नदीत खळखळून वाहणारे मुबलक पाणी असतानाही विद्युत रोहित्राच्या अनियमितपणामुळे शेताला पाणी देणे अवघड झाले आहे. परीणामी काढणीस आलेली उभी पिके जळू लागली आहेत. गावच्या पदाधिकार्‍यांना वेळोवेळी विनवणी करूनही वीज वितरण कंपनीचे संबंधित अधिकारी विद्युत रोहीत्र बसविण्याची दखल घेतली जात नसल्याने भोसे येथील शेतकरी त्रस्त झाले आहेत.

गेल्या अनेक वर्षांपासून आर्थिक घडी बसविलेल्या शेतकर्‍यांचे काही दिवसात आर्थिक गणित कोलमडली आहेत. सतत विद्युत पुरवठा खंडित होत असल्याने मुबलक पाणी पुरवठा असूनही शेतपिकांना वेळेवर पाणी देता येत नाही. त्यामुळे हाती आलेली शेतपिके विजेअभावी जळून जात आहे. तर या भागातील काही शेतकर्‍यांनी एकत्रित येऊन बनविलेल्या लिफ्ट योजना विजेअभावी मोडकळीस येवू लागल्या आहेत. त्यामुळे परिसरातील व भोसे येथील शेतकरी वर्ग आर्थिक संकटात सापडला आहे.

आंदोलनाचा इशारा
भोसे येथील गजपार्वतेश्‍वर लिफ्टचे नादुरुस्त झालेले विद्युत रोहित्र नव्याने बसविण्यात यावे. तसेच शेतीसाठी सुरळीत विद्युत पुरवठा व्यवस्थित करण्यात यावा, अशी मागणी जोर धरू लागली आहे. हे काम त्वरित मार्गी न लागल्यास शेतकर्‍यांच्या वतीने आंदोलनाचे हत्यार उपसण्याचा इशारा देण्यात आला आहे.

गजपार्वतेश्‍वर लिफ्ट मुबलक पाणी
भोसे येथील शेतकर्‍यांनी सुमारे 30 ते 40 वर्षांपूर्वी जमिनी ओलिताखाली आणण्यासाठी गजपार्वतेश्‍वर लिफ्टची निर्मिती केली आहे. पाळीपाळीने शेतकर्‍यांच्या जमिनीला पाणी दिले जाते. या लिफ्ट लगत कोल्हापूर पद्धतीचा मोठा बंधारा असल्याने भामा नदीचे वाहते पाणी नसल्यास येथील बंधार्‍याचे झिरपते पाणी परिसरातील शेतकरी आपल्या जमिनीतील पिकांसाठी वापरतात. कोल्हापूर पद्धतीच्या बंधार्‍यामुळे व भामा नदीच्या वाहत्या पाण्यामुळे शेतकर्‍यांच्या विहिरींना व शेतीसाठी घेतलेल्या बोअरवेलला समाधानकारक पाणी उपलब्ध असल्याने शेतकरी पिके घेतात.