कल्याण : टिटवाळा येथील इंदिरानगर मस्जिदजवळ एका व्यक्तीच्या अंगावर वीज वितरण कंपनीची विद्युत प्रवाह वाहक एलटी वीज वाहिनी तुटून पडल्याने विजेचा जोरदार झटका लागून त्याचा जागीच मृत्यू झाला. या बाबत टिटवाळा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
रविवारी सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास टिटवाळ्यातील इंदिरानगर येथील मस्जिदजवळ अनोळखी इसम (35) यांच्या अंगावर विद्युत वाहक एलटी वीज वाहिनी पडल्याने विजेचा झटका लागून जागीच मृत्यू झाला. तालुक्यात बर्याच ठिकाणी वीज वितरण कंपनीच्या जीर्ण झालेल्या विद्युत वाहिन्या, पोल, कंडक्टर व झेंपर्स पहावयास मिळतात. पावसाळ्या पूर्वी काही प्रमाणात विज वितरण कंपनी दरवर्षी डागडुजी करत असते. परंतू ज्या प्रमाणात डागडुजी व दुरूस्तीचे काम व्हायला हवे आहे ते होत नाही.
टिटवाळा परिसरात विद्युत वाहक वाहिन्या व पोल पडून अपघात घडून नागरिक व जनावरांचा जीव गेल्याच्या घटना तालुक्यात घडल्या आहेत. परंतु या बाबीकडे विज वितरण कंपनीकडून कानाडोळा होत असल्याचा आरोप नागरिकांकडून होत आहे. याबाबत सामाजिक कार्यकर्ते विजय देशेकर यांनी वितरण कंपनी नेहमीच कामात चालढकल व निष्काळजीपणा करत आहे. टिटवाळा शहरासह ग्रामीण भागातील जुन्या व जीर्ण झालेल्या वाहिन्या तसेच पोल बदल्याची मागणी केली आहे. पण त्यावर काहीही कार्यवाही झालेली नाही. या संदर्भात आम्ही आंदोलन छेडणार आहोत. तसे पत्र पण दिले असल्याचे सांगितले.