नगरदेवळा। येथून जवळच असलेल्या चुंचाळे शिवारात विजेचा तार अचानक तुटून पडल्याने शेतातून घरी येत असलेल्या युवकाचा जागीच मृत्यु झाल्याची घटना आज 24 रोजी दुपारी 1 वाजेच्या दरम्यान घडली. बाळद येथील रहिवासी उमेश रामकीसन झंवर (वय-45, ह.मु. नगरदेवळा) हे दुपारी 1 वाजेच्या सुमारास शेतीची कामे आटपुन घरी येत असतांना चुंचाळे शिवारातील जुन्या बाळद रस्त्याजवळ 220/240 व्होल्ट क्षमतेची विद्युत तार अचानक अंगावर येऊन अडकुन पडल्याने उमेश झंवर यांच्या शरीराभोवती तार गुंडाळला जाऊन शॉक लागून तरूण शेतकर्यास आपल्या प्राणास मुकावे लागले. सदरची घटना घडताच आजुबाजुचे शेतकरी व नागरीक यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन विद्युतप्रवाह बंद करण्यास सांगितले. या घटनेमुळे महावितरणावर संताप व्यक्त केला.
नगरदेवळा व बाळद गावावर पसरली शोककळा
जिर्ण तारांमुळे नाहक एकाचा बळी गेल्याची गावात चर्चा आहे. दुपारी दीड वजेच्या सुमारास त्यांना शवविच्छेदनासाठी पाचोरा शासकीय रूग्णालयात पाठविण्यात आले. उमेश झंवर हे अतिशय मन मिळाऊ स्वभावाचे असल्याने त्यांची घटना कळताच नगरदेवळा व बाळद गाववर शोककळा पसरली. त्यांच्या पश्चात दोन मुले, पत्नी, भाऊ असा मोठा परिवार असून ते बाळदचे माजी सरपंच रविंद्र झंवर यांचे ते लहान बंधु होते. दरम्यान तालुक्याचे माजी आमदार दिलीप वाघ यांनी तातडीने घटनास्थळी भेट देवून सदर घटनेची चौकशी केली.