विजेचे खांब, पदपथांची दुरवस्था जीवावर बेतणार

0

नवी मुंबई । सीबीडी सेक्टर 11 मधील रायगड भवनकडे जाणार्‍या रस्त्यावरील विद्युत खांब जीर्ण होऊन कोसळला आहे. परंतु, या खांबाची डीपी अनेक महिन्यांपासून रस्त्यावर पडून आहे. तसेच या ठिकाणच्या पदपथांची झाकणेदेखील तुटलेली आहेत. पालिकेच्या उदासीनतेमुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. सीबीडीमधील रायगड भवन या ठिकाणी अनेक विभागाची कार्यालये आहेत. कामानिमित्त या ठिकाणी शेकडो नागरिक आणि याठिकाणी काम करणारे कर्मचारी ये-जा करतात. त्यामुळे येथे नेहमीच नागरिकांची गर्दी असते.

महापालिकेच्या जुन्या कार्यालयाच्या बाजूने रायगड भवनकडे जाणार्‍या रस्त्यावरील एक विद्युत खांब जीर्ण होऊन अनेक महिन्यांपूर्वी कोसळला होता. हा खांब या ठिकाणाहून हटविण्यात आला आहे. परंतु, विद्युत केबल आणि या खांबाची डीपी रस्त्यावरच पडून आहे. विजेच्या एका खांबातून दुसर्‍या खांबाकडे केला जाणारा विद्युत पुरवठा सुरु असल्याने या पडलेल्या खांबाच्या दोन्ही बाजूचे खांब सुरू आहेत. रस्त्यावर पडलेल्या केबल आणि डीपीमध्येदेखील रात्री वीजपुरवठा सुरू असतो. त्यामुळे अपघाताची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे.

अपघात होण्याची शक्यता
रायगड भवनकडे जाणार्‍या रस्त्यावर रात्रीच्या वेळेस अंधार पसरतो तसेच याच रस्त्यावरील पदपथांची दुरवस्था झालेली असून गटारावरील झाकणेदेखील तुटलेली आहेत. त्यामुळे नागरिकांना रस्त्यावरून चालावे लागत आहे. या दोन्ही समस्यांमुळे अंधारात या स्त्यावरून चालताना मोठा अपघात घडण्याची शक्यता आहे. पालिकेने लवकरात लवकर या समस्या सोडवण्याची मागणी नागरिक करत आहेत.