विजेच्या अनियमीतपणाचा कांदा उत्पादकांना फटका

0

यवत । दौंड तालुक्यात सध्या कांदा लागवडीचा हंगाम सुरू आहे. लागवड करताना शेतकर्‍यांना मजूर आणि विजेची समस्या मोठ्या प्रमाणार भेडसावत आहे. यामुळे दोन दिवसांत होणार्‍या कांदा लागवडीचे काम तीन-चार दिवस शेतकर्‍यांना करावे लागत आहे. वीजमंडळाच्या अनियमीतपणाचा फटका कांदा उत्पादकांना बसत असल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.

वीज कधी येईल आणि कधी जाईल याचा ताळमेळ नसल्याने शेतकर्‍यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. प्रत्येक आठवड्यात वीजेची येण्या-जाण्याची वेळ बदलत आहे. एक आठवडा वीज 10.45 वाजता येते तर दुसर्‍या आठवड्यात रात्री 1 च्या आसपास वीज येते. या काळात लागवडीचे काम मात्र तीन ते चार तास होते. परंतु शेतकर्‍यांना संपूर्ण दिवसाची मजुरी द्यावी लागत आहे. महावितरणच्या या वेळापत्रकाला शेतकरी अक्षरशः वैतागून गेला आहे. त्यात दुष्काळ परिस्थितीमुळे दोन वर्षे विजेची बिले थकलेली आहेत. ते भरण्यासाठी वीजमंडळाचा तगादा चालूच आहे. एक आठवडा रात्रीची वीज त्यामध्ये कांदा लागवडीचे काम होत नाही, ज्या आठवड्यात दिवसा असते ती किती वेळ राहील याचा भरोसा नाही यामुळे दिवसा आठ तास शेतकर्‍यांना वीजपुरवठा करावा, अशी मागणी दौंड तालुक्यातील शेतकर्‍यांकडून होत आहे.