पिंपळनेर । शहरातील इंदिरा नगरात वीजेचा झटका लागून दोन्ही भावांचा दुर्देवी मृत्यू झाल्याची घटना दि.1 रोजी घडली. या घटनेने पिंपळनेरसह परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. दरम्यान बाथरूममध्ये विजेचा प्रवाह उतरल्याने हि घटना घडल्याचे सांगितले जात आहे. पिंपळनेर येथील इंदीरानगरमध्ये राहणारा सागर कृष्णा सुर्यवंशी (वय 22) हा सकाळी साडे दहा वाजेच्या सुमारास अंघोळीसाठी बाथरूममध्ये गेला होता. त्याठिणी विजेचा प्रवाह उतरल्याने त्याला जोरदार झटका लागला त्यामुळे त्याचा जागेवरच मृत्यु झाला. सागर पडल्याचे रविंद्र कृष्णा सुर्यवंशी (वय 26) याच्या लक्षात येताच त्याने बाथरूममध्ये धाव घेतली. मात्र तो ही विजेच्या प्रवाहात ओढला गेल्याने त्याचाही जागीच दुर्देवी मृत्यू झाला. बाथरुमच्या बाजूस असलेल्या एका बोर्डातील वायर कट झाल्याने भिंतीत वीजप्रवाह उतरला होता,असे सांगितले जात आहे. दोघे भावंड गावात आईसह राहुन मोलमजूरी करत होते. रविंद्र हा एम.ए.चे शिक्षण घेत होता. तर सागर रंग पेंटीगचे काम करत होता. दोघ भावांच्या या दृदेैवी मृत्यूने इंदिरानगरसह पिंपळनेर परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.