नगरदेवळा – येथून जवळ असलेल्या चुंचाळे शिवाराच्या शेतात असलेल्या डीपीवर काम करत असतांना अचानक विजेचा प्रवाह सुरू झाल्याने खांब्यावर काम करणाऱ्या एमएसईबीचे तात्पुरत्या स्वरूपावर काम करणाऱ्या 24 वर्षीय तरूणाचा विजेच्या तिव्र धक्क्याने खाली पडल्याने जागीच मृत्यू झाल्याची घटना सांयकाळी 5.30 वाजेच्या सुमारास घडली असून याबाबत पाचोरा पोलीसात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
मिळालेली माहिती अशी की, चुंचाळे शिवारातील ईश्वर संतोष पाटील यांच्या शेतात असलेल्या डीपीवर कायमस्वरूपी असलेले वायरमन श्री.राठोड यांच्यासोबत सहकारी एमएसईबीत कायमस्वरूपी नसलेले रूपेश सुकदेव पाटील (वय-24) रा. तारखेडा ता.पाचोरा हे डीपीवरील विजेचा पुरवठा बंद करून वायर बदलविण्याचे काम करत होते. परवानगीने बंद केलेला विज पुरवठा अचानक सुरू झाल्याने खंब्यावर काम करत असलेले रूपेश पाटील यांना विजेचा जोराचा धक्का बसला. विजेचा धक्का बसल्यावर ते खंब्यावरून खाली पडल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. यावेळी जवळ असलेले श्री. राठोड यांच्या लक्षात ही गोष्ट आल्याने त्यांनी नागरीकांच्या मदतीने मृतदेह नगरदेवळा ग्रामीण रूग्णालयात दाखल केले. नगरदेवळ्याचे वैद्यकिय अधिकारी यांनी मृत घोषीत केले. दरम्यान, रूपेशचा कामावर असतांना मृत्यू झाल्याने नातेवाईकांची ग्रामीण रूग्णालयात गर्दी जमली होती. मयत रूपेशच्या पश्चात एक भाऊ, विधवा आई असा परीवार आहे. घटनेबाबत पाचोरा पोलीस स्टेशनला गुन्हा नोंदविण्यात आला आहे.