वडगाव मावळ : येथील आंबेवाडीमध्ये बांधकाम मजुराचा हायटेन्शन वायरला धक्का लागून मृत्यू झाला. ही घटना गुरुवारी दुपारी एकच्या सुमारास घडली. संतोष सुदेश देहारे (वय 29, रा. कान्ही, मावळ. मूळ रा. वेरपिंगळे, अमरावती), असे मयत तरुणाचे नाव आहे. आंबेवाडी येथे शनिराज मंगल कार्यालय रोड येथे शिवराज चोरगे यांच्या घराचे बांधकाम सुरू होते. यावेळी दुसर्या मजल्याचे स्लॅपचे काम सुरू असताना त्यासाठी गज घेऊन जात असताना जवळच असलेल्या हाय टेन्शन तारेला गजाचा धक्का लागल्याने संतोष याचा जागीच होरपळून मृत्यू झाला.
अनधिकृत बांधकामाचा बळी : ग्रामपंचायत
ग्रामपंचायत प्रशासनाने हा अनधिकृत बांधकामाचा बळी असून यास सर्वस्वी पीएमआरडीए जबाबदार असल्याचा आरोप केला आहे. याविषयी बोलताना ग्रामपंचायत सदस्य राजेंद्र सातकर म्हणाले की, हद्द जरी ग्रामपंचायतीची असली तरी बांधकाम व विकास कामांसाठी पीएमआरडीएची परवानगी घ्यावी लागते. मात्र, नियमांची योग्य ती माहिती कधी पीएमआरडीएने दिली नाही. कारण त्यांचे कार्यालय औंधमध्ये असून तेथून कोणता अधिकारी कधी येत नाही व ग्रामस्थही तिथे जात नाहीत. त्यामुळे लोक अगदी हाय टेन्शन वायरपासून केवळ 3 फूट अंतरावर बांधकाम करत आहेत. त्यांच्या घराची गॅलरी वायरला चिटकून असते. त्यात महावितरण विभागानेही आधी विजेची तार उभी केली होती. ती रस्त्यावर आडवी केली. त्यामुळे ती बांधकामांच्या अधिकच जवळ आली. या सार्या चुकांचा हा बळी आहे, असा आरोपच त्यांनी केला आहे.