संत देव गोपाळ शास्त्री महाराज यांचे मत
नंदूरबार येथे राज्यस्तरीय वारकरी संमेलनाचा आज समारोप
नंदुरबार – मानव अध्यात्म शिवाय अपूर्ण आहे तर विज्ञानही अध्यात्म शिवाय परिपूर्ण नाही जोपर्यंत मानवाला अध्यात्म समजणार नाही तोपर्यंत त्याला विज्ञानही कळणार नाही म्हणूनच विज्ञानाकडे वाटचाल करण्यासाठी अध्यात्माची कास धरणे महत्त्वाचे आहे असे प्रतिपादन संत देवगोपाळ शास्त्री महाराज अखिल भारतीय वारकरी मंडळाच्या वतीने माळीवाडा परिसरात रामकृष्ण नगरीत राज्यस्तरीय वारकरी संमेलन व ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याचे आयोजन करण्यात आलेले असून, गुरुवारी अध्यात्म व विज्ञान विषयावर हभप.देव गोपाळ शास्त्री महाराज बोलत होत.
या महाराजांची होती उपस्थिती
यावेळी व्यासपीठावर अखिल भारतीय वारकरी मंडळाचे राष्ट्रीय अध्यक्ष हभप.प्रकाश महाराज बोधले, संत बाबाजी महाहंस महाराज आडगावकर, भागवताचार्य संतोषनंद शास्त्री महाराज वृंदावनवासी, हभप.अनिल महाराज वाळके, ह.भ.प.अविनाश जोशी महाराज, ह भप. विजय महाराज जाधव, ह.भ.प नामदेव शास्त्री महाराज टेंभेकर, ह.भ.प. संध्या माळी सुरतकर, ह.भ.प. भिला खोरीकर, ह.भ.प. अंबादास महाराज कोडदेकर, ह.भ.प.समाधान महाराज उपस्थित होते.
यशस्वितेसाठी यांनी घेतले परिश्रम
यावेळी मान्यवरांनी विविध विषयांवर उपस्थितांना मार्गदर्शन केले. यावेळी संत देवगोपाळ महाराज म्हणाले, कर्जबाजारीपणामुळे आत्महत्या हा शेतकऱ्यांपुढील पर्याय होऊ शकत नाही. कर्जमुक्ती मुळे आत्महत्या थांबणार नसून कर्ज मुक्त व्हायचं असेल तर ईश्वर भक्ती व संतसंगतीत राहा यातच खरा राष्ट्राच्या विकास होणार आहे. यावेळी ‘बेटी बचाव, बेटी पढाव’ व महिला सक्षमीकरण या विषयावर भागवताचार्य संध्याताई माळी सुरतकर यांनी प्रबोधन केले. प्रसंगी मोठ्या संख्येने भाविक उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक ह.भ.प. अनिल महाराज वाळके यांनी तर सूत्रसंचालन ह.भ.प.ज्ञानेश्वर महाराज माळी व ह.भ.प. पावबा महाराज अक्राळेकर यांनी केले. दुपारी परिसरातून मिरवणूक काढण्यात आली. यावेळी माळी वाड्यात भाविकांनी घरासमोर आकर्षित रांगोळ्या काढल्या होत्या.
संमेलनाचा आज समारोप
अखिल भारतीय वारकरी मंडळाच्या जिल्हा कमिटीच्या वतीने व माळी समाजाच्या संयोजनातून होत असलेल्या राज्यस्तरीय वारकरी संमेलन व ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याचे राष्ट्रीय अध्यक्ष ह.भ.प. प्रकाश महाराज बोधले यांच्या काल्याच्या कीर्तने शुक्रवारी समारोप होत आहे. गेल्या आठवड्याभरापासून संमेलनात अनेक राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांनी हजेरी लावली होती. अनेक समाज प्रबोधनकारांनी भाविकांना त्यांच्या सुश्राव्य वाणीतुन मार्गदर्शन केले.