विज्ञानसूर्य मावळला, स्टिफन हॉकिंग कालवश

0

76 व्यावर्षी केंब्रिजमध्ये घेतला अखेरचा श्‍वास

केंब्रिज : विश्‍व उत्पत्ती आणि कृष्णविवरांसदर्भात संशोधनाकील मोठे योगदान असलेले प्रख्यात शास्त्रज्ञ आणि लेखक स्टिफन हॉकिंग (76) यांचे केंब्रिजमधील त्यांच्या निवासस्थानी निधन झाले. वयाच्या 21 वर्षापासून त्यांना दुर्धर आजाराने ग्रासले होते. अशाही परिस्थितीत त्यांनी विज्ञानाच्या क्षेत्रात नवनवीन चमत्कार घडवून आणले. तसेच, विश्‍वाचे कोडे सोप्या भाषेत समजावून सांगितले. द ग्रँड डिझाईन, युनिव्हर्स इन नटशेल, माय ब्रीफ हिस्ट्री, द थिअरी ऑफ एव्हरीथिंग ही हॉकिंग यांची पुस्तके जगप्रसिद्ध आहेत. विश्‍वाच्या उत्पत्तीच्या रहस्यांवर आधारित अ ब्रीफ हिस्ट्री ऑफ टाइम हे पुस्तक खूप गाजले.

30 वर्षे गणिताचे अध्यापन
स्टिफन हॉकिंग यांचा जन्म 8 जानेवारी 1942 रोजी इंग्लंडमधील ऑक्सफर्ड येथे झाला. त्यांचे वडील डॉ. फ्रँक हॉकिंग जीवशास्त्राचे संशोधक होते. त्यांची आई इझाबेल ऑक्सफर्डची पदवीधर होत्या. हॉकिंग यांना विद्यार्थीदशेपासूनच संगीत, वाचन, गणित आणि भौतिकशास्त्राची आवड होती. विज्ञान विषयात त्यांना रस होता. गणिताच्या शिक्षकाच्या प्रेरणेमुळे त्यांना विद्यापीठात गणिताचे शिक्षण घ्यावयाचे होते; पण त्यांनी ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीत प्रवेश घ्यावा, असे त्यांच्या वडिलांना वाटत होते. 1959 साली त्यांनी कॉसमॉलॉजी हा विषय निवडून प्रवेश घेतला आणि त्यासाठी त्यांना स्कॉलरशीपसुद्धा मिळाली होती. त्यांनी 1962 मध्ये ऑक्सफर्डमधून पदवी संपादन केल्यानंतर उच्च शिक्षणासाठी त्यांनी केंब्रिज विद्यापीठात प्रवेश घेतला. याच विद्यापीठात त्यांनी 30 वर्षे गणिताचे अध्यापन केले. विश्‍वशास्त्र (कॉस्मॉलॉजी) आणि क्वांटम ग्रॅव्हिटी या दोन शाखांमध्ये कृष्णविवरांच्या संदर्भात त्यांचे योगदान मोठे होते. 2009 मध्ये त्यांना प्रेसिडेन्शिअल मेडल फॉर फ्रीडम या अमेरिकेतील सर्वोच्च नागरी सन्मानाने गौरविले होते. कमांडर ऑफ दी ब्रिटिश एम्पायर या पुरस्काराने त्यांना गौरवले होते.

नोबेलची हुलकावणी
नॅशनल जिओग्राफिक मॅगझीन द सायन्स ऑफ लिबर्टीचे लेखक टिमोथी फेरिस यांच्या म्हणण्यानुसार, हॉकिंग यांची कृष्णविवरांसंदर्भातली थिअरी सैद्धांतिक भौतिकशास्त्रात स्वीकारण्यात आली आहे. मात्र ती सिद्ध करण्याचे कोणतेही मानक नसल्याने ती रुढार्थाने सिद्ध झालेली नाही. जे सिद्धांत हॉकिंग यांनी मांडले ते प्रत्यक्ष पाहता आले असते तर त्यांना नोबेल मिळाले असते. पण त्यांनी सांगितलेले निष्कर्ष पुढच्या अब्जावधी वर्षांमध्येही पाहता येणार नाहीत. पीटर हिग्ज यांनी 1964 मध्ये हिग्ज बोसॉन कणांबद्दल भविष्यवाणी केली होती. हा प्रयोग वैज्ञानिकांनी प्रत्यक्षात 2012 मध्ये युरोपीयन संशोधन संस्था सर्नने जेनिव्हात लार्ज हॅड्रन कोलायडरमध्ये स्फोट घडवून केला. त्यानंतर त्यांना 2013 या वर्षात नोबेल पुरस्कार विभागून देण्यात आला.