स्वामी श्रीकांतानंजी महाराज यांचे प्रतिपादन
हिवरा आश्रम,ता.मेहकर : युगाचार्य स्वामी विवेकानंद यांनी त्याग व सेवा हेच भारताचे आदर्श सांगितले होते. हेच आदर्श आपणाला तरुणाईवर बिंबवावे लागणार आहेत, असे सांगून आजच्या अतिप्रगत विज्ञानामुळे मानवाची प्रगती झाली. जीवन सुसह्य झाले, परंतु मानवी मूल्यांची घसरण झाली. त्यामुळे मूल्याविना प्रगती अधुरी आहे, असे प्रतिपादन रामकृष्ण मठ, पुणेचे अध्यक्ष स्वामी श्रीकांतानंदजी महाराज यांनी केले. बहुचर्चित विवेकानंद विचार साहित्य संमेलनाचे उद्घाटन स्वामीजींच्याहस्ते विवेकानंद प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलनाने झाले. याप्रसंगी ते उद्घाटनपर भाषणात बोलत होते. याप्रसंगी संमेलनाचे अध्यक्ष तथा विवेकानंद आश्रमाचे अध्यक्ष आर. बी. मालपाणी, स्वागताध्यक्ष अशोक थोरहाते, रामकृष्ण आश्रम, गांगलगावचे संन्याशी सुनील महाराज, ज्येष्ठ विश्वस्त दादासाहेब मानघाले, महाबीजचे संचालक वल्लभरावबापू देशमुख, सचिव संतोष गोरे,हभप गजाननदादा शास्त्री महाराज आदींची विचारपीठावर उपस्थिती होती. या सोहळ्याप्रसंगी विवेकानंद जन्मोत्सवाच्या लाईव्ह प्रेक्षपणाचेही उद्घाटन स्वामी श्रीकांतानंदजी यांच्याहस्ते करण्यात आले, या उद्घाटनानंतर संमेलनस्थळी टाळ्यांचा एकच कडकडाट झाला.
स्वामी श्रीकांतानंदजी म्हणाले, स्वामी विवेकानंद यांच्यापासून प्रेरणा घेऊन पूज्यनीय शुकदास महाराज यांनी गोरगरीब, गरजुंची सेवा केली. शिक्षण व आरोग्य ही क्षेत्रे त्यांनी आपल्या सेवेसाठी निवडली. या सेवेसाठीच त्यांनी आपले जीवन समर्पित केले. गोरगरिबांच्या मुलांना चांगले शिक्षण मिळावे ही त्यांची अपेक्षा होती. त्यांच्या सेवाकार्याचा वारसा पुढेही चालूच राहील, अशी अपेक्षाही स्वामीजींनी व्यक्त केली. आज देशाला अन् एकूण समाजाला स्वामी विवेकानंद यांच्या विचारांची गरज आहे, असे सांगून ते म्हणाले की,सगळीकडे अशांती, दुःख पसरले आहे. देशाला विविध समस्यांतून बाहेर काढायचे असेल तर स्वामीजींचेच विचार मार्गदर्शक आहेत. प्रत्येक समस्या केवळ स्वामीजींच्याच विचारातून सुटू शकते. विवेकानंदांच्या प्रेरणादायी विचारातूनच हा देश महान होईल, असा विश्वासही स्वामीजींनी व्यक्त केला.
चांगली माणसे निर्माण करावी लागतील!
स्वामी विवेकानंद यांच्या विचारातून हे राष्ट्र आणि जग प्रेरणा घेत राहतील, असे सांगून स्वामी श्रीकांतानंदजी म्हणाले, भारताला स्वराज्य मिळाले, या स्वराज्याचे आता सुराज्यात परिवर्तन करावे लागणार आहे. स्वामीजी चार वर्षे अमेरिका व विदेशात होते. त्यांच्या प्रेरणादायी विचारातून प्रेरणा घेऊनच देशाच्या स्वातंत्र्यासाठी बलिदान देणारे तरुण क्रांतीकारक निर्माण झाले. म्हणून हा देश स्वातंत्र्य होऊ शकला. स्वातंत्र्य भारतातील शिक्षण व्यवस्थेवर मात्र याप्रसंगी स्वामीजींनी नाराजी व्यक्त केली. ते म्हणालेत, आजच्या शिक्षणातून पोटार्थी तरुण निर्माण झालेत. या शिक्षणाने नोकरीचा प्रश्न सुटेल परंतु चारित्र्यसंपन्न तरुण निर्माण होणार नाही. चारित्र्याचे गठण, मनाची शक्ती वाढविणारे आणि मनुष्य निर्माण करणारे शिक्षण आपणास हवे आहे. स्वामी विवेकानंद यांच्या विचारातूनच चारित्र्यसंपन्न तरुण अन् विद्यार्थी घडू शकतील, असेही स्वामी श्रीकांतानंदजी यांनी याप्रसंगी सांगितले.
स्वामीजींनी देशाची प्रतिमा बदलवली!
स्वामी विवेकानंद अमेरिकेत जाण्यापूर्वी भारताची जगात ओळख ही रानटी लोकांचा देश अशीच होती. येथील उदात्त संस्कृती, मानवमुक्तीच्या विचारांची तिकडे माहिती नव्हती. परंतु, स्वामी विवेकानंदांनी भारताची ही ओळख आपल्या कर्तृत्व व ज्ञानाने बदलवली. तिकडील स्वामीजींचे कार्य इतके देदीप्यमान झाले की पश्चात्यांना हे कळून चुकले की,भारतात धर्मप्रसारक पाठविण्याची गरज नाही. जगात स्वामीजींना ओळखले जाते, स्वामीजी हीच आपली जगभरातील ओळख आहे, त्यांनी शुद्ध वेदांत हा अमेरिकेत सांगितला; तर व्यावहारिक वेदांत हा भारताला सांगितला. या व्यवहारिक वेदांतातूनच शिव समजून जीवाची सेवा करा, हा संदेश त्यांनी दिला होता, असेही स्वामी श्रीकांतानंदजी यांनी सांगून,विवेकानंद विचार साहित्य संमेलनाचे उद्घाटन झाले, असे जाहीर केले.
विवेकानंद जन्मोत्सव लाईव्ह प्रक्षेपणाचे उद्घाटन
याप्रसंगी स्वामी श्रीकांतानंदजी यांनी विवेकानंद जन्मोत्सवाच्या लाईव्ह प्रक्षेपणाचेही संगणकाची कळ दाबून उद्घाटन केले. विवेकानंद आश्रमाच्या माहिती व तंत्रज्ञान आणि प्रसारमाध्यम विभागाच्यावतीने ही सोय जगभरातील विवेकानंद विचारप्रेमींसाठी उपलब्ध करून दिली आहे. पहिल्याच दिवशी सुमारे 71 हजार दर्शकांनी हा सोहळा इंटरनेटच्या माध्यमाद्वारे ऑनलाईन पाहिला. विवेकानंद विचार साहित्य संमेलनाचे बहारदार सूत्रसंचलन वेदांताचार्य गजाननदादा शास्त्री यांनी केले तर प्रास्ताविक संतोष गोरे यांनी केले.