पीसीसीओईआर मध्ये स्टार्टअप्स नाविन्य आणि उपक्रम विषयावर चर्चासत्र
स्टार्टअप्स प्रतिनिधींनी केले विद्यार्थ्यांना मार्गदर्शन
पिंपरी : विज्ञान, संगणक, माहिती तंत्रज्ञान क्षेत्रामध्ये मोठी क्रांती होत आहे. त्यामुळे आजच्या नवअभियंत्यांना अनेक संधी उपलब्ध होत आहेत. शासन मेक इन इंडिया, मेड इन इंडिया, मॅग्नेटीक महाराष्ट्रच्या माध्यमातून स्टार्टअप्सला प्रोत्साहन देत आहे. तसेच त्यासाठी प्रोत्साहन व आर्थिक सहाय्य करीत आहे. या योजना व संधींचा लाभ घेतला पाहिजे, असे प्रतिपादन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या आयआयएल विभागाच्या संचालक डॉ. अपूर्वा पालकर यांनी केले.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आणि पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या (पीसीईटी) रावेत येथील पिंपरी चिंचवड कॉलेज ऑफ इंजिनिअरींग अॅण्ड रिसर्चच्या (पीसीसीओईआर) वतीने विद्यार्थ्यांसाठी स्टार्टअप्स नाविन्य आणि उपक्रम विषयावर आयोजित केलेल्या चर्चासत्रात मार्गदर्शन केले. यावेळी पीसीसीओईआरचे प्राचार्य डॉ. हरिष तिवारी यांच्यासह विविध विद्याशाखांचे प्रमुख, विद्यार्थी उपस्थित होते. चर्चासत्रात स्टार्टअप्सच्या प्रतिनिधींनी आपले अनुभव सांगितले. प्राचार्य डॉ. तिवारी म्हणाले, विद्यार्थ्यांनी जबाबदार नागरिक म्हणून पुढे यावे असाच प्रयत्न संस्थेकडून होत असतो. त्यामुळेच नोकरीच्या मागे धावण्याऐवजी स्वत:चा व्यवसाय सुरू करून अनेकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून द्याव्यात. या उद्देशाने पीसीईटी नेहमी विविध स्पर्धा, चर्चासत्र, परिसंवादाचे आयोजन करीत असते. त्याचा विद्यार्थ्यांना निश्चितच फायदा होतो, असेही डॉ. तिवारी यांनी सांगितले.
केपीआयटीचे विभाग व्यवस्थापक विशाल पिल्लाई म्हणाले की, उर्जा आणि सुरक्षित वाहतूक तंत्रज्ञान क्षेत्रामध्ये केपीआयटी काम करत आहे. तंत्रज्ञानाचा योग्य वापर करून अपघात कसे रोखता येतील, सुरळीत वाहतुकीसाठी उत्तम दर्जाच्या सुविधा देण्यासाठी केपीआयटी प्रयत्नशील असते. अभियांत्रिकी विद्याशाखेतील मुलांच्या विचारांना, कल्पनांना चालना देण्यासाठी केपीआयटी स्पार्कल सारख्या स्पर्धा आयोजित केल्या जातात. तसेच विद्यार्थ्यांना केपीआयटीच्या तज्ज्ञांसमवेत काम करण्याची संधीही उपलब्ध करून देण्यात येते, असे पिल्लाई यांनी सांगितले.
टायचे संचालक जितेंद्र टन्ना मार्गदर्शन करताना म्हणाले की, भारतीयांना इम्पोर्टेड वस्तुंचे आकर्षण असते ही मानसिकता बदलण्याची गरज आहे. भारतातही अनेक दर्जेदार वस्तुंचे उत्पादन होते. मुंबई, पुणे, नाशिक येथून चांगले स्टार्टअप्स सुरू झाले आहेत. भारतात 90 टक्के स्टार्टअप्स पहिल्या पाच वर्षांतच अपयशी ठरतात परंतु योग्य नियोजन, आर्थिक शिस्त, ग्राहकांची गरज ओळखून दर्जेदार उत्पादन, विक्री पश्चात सेवा, उत्पादन विक्रीचे कौशल्य, काळानुरून उत्पादनात केलेला बदल आदींचा विचार करून प्रयत्न करत राहिले तर निश्चितच यश मिळते, असा विश्वास टन्ना यांनी व्यक्त केला. वर्डस् माया या स्टार्टअप्सचे संस्थापक संचालक हर्षद भागवत म्हणाले की, विद्यार्थ्यांनी आपल्या मनातील संकल्पनांना प्रत्यक्षात उतरवण्यासाठी अखंड मेहनत घेतली पाहिजे. अनेकांना इंग्रजी संभाषणाची समस्या भेडसावते. यावर मात करण्यासाठी वर्डस् माया हे स्टार्टअप्स सुरू करण्यात आले. विद्यार्थी, व्यावसायिक, उद्योजक, माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात काम करणा-या व्यक्तींना इंग्रजी भाषेतून चांगल्या प्रकारे संभाषण करता यावे, यासाठी वर्डस् माया अॅप मदत करणारे चांगले साधन आहे, असे भागवत यांनी नमूद केले.