विज ग्राहकांना मागणी करुनही मीटर मिळेना

0

भुसावळ। शहरात बहुतांश नागरिकांनी आपल्या घरात विज मीटर मिळण्यासाठी महावितरणकडे अर्ज केला आहे. तरी देखील या ग्राहकांना मीटर बसवून देण्यात येत नाही. महावितरण कंपनीने गेल्या महिन्यात प्रलंबीत 150 ग्राहकांना वीजमीटरचा पुरवठा केला. यानंतरही शहरातील वीज मीटरची प्रतीक्षा यादी कायम असल्याची माहिती सुत्रांनी दिली.

150 ग्राहकांना मीटर उपलब्ध
शहरात घरबांधणीनंतर नवीन वीजमीटर घेण्यासाठी ग्राहकांना सध्या कसरत करावी लागत आहे. प्राप्त माहितीनुसार महावितरण कंपनीकडे मीटरची टंचाई आहे. यामुळे मागणी अर्ज करुनही ग्राहकांना मीटर पुरवठा होत नाही. काही ग्राहकांचे मीटर जळाल्याने त्यांनीदेखील अर्ज केला आहे. मात्र, कंपनीकडे मीटर उपलब्ध नसल्याने ग्राहकांना पुरवठा होत नसल्याचे चित्र आहे. महावितरण कंपनीने गेल्या महिन्यात शहरात 150 ग्राहकांना मीटर उपलब्ध करुन दिले.
यानंतरही गरजेप्रमाणे मीटर उपलब्ध होणे अपेक्षित होते, असे सुत्रांनी सांगितले. काही ग्राहकांचे विज मीटर हे नादुरुस्त झाल्यामुळे यात विज वापराच्या रिडींगमध्ये जास्तीची तफावत असते. त्यामुळे ग्राहकांना अव्वाच्या सव्वा विज बिल देण्यात येत आहे. याबाबत वारंवार तक्रार करुन देखील अधिकार्‍यांकडून याकडे दुर्लक्ष होत आहे. तसेच ग्राहकांनी हे नादुरुस्त झालेले मीटर बदलून मिळण्याची मागणी केली आहे. यामुळे ग्राहकांना जास्तीचा भुर्दंड सहन करावा लागत असून मनस्ताप सहन करावा लागत आहे. त्यामुळे महावितरणने याकडे लक्ष देण्याची आवश्यकता आहे.