विटभट्ट्यांना लोक वैतागले

0

पाचोरा। आज 5 जून सर्वत्र पर्यावरण दिन म्हणून साजरा करण्यात येणार आहे. यंदा पावसाळा लवकर सुरु होणार असल्याने शेती लागवडीला देखील दरवर्षी प्रमाणे लवकर सुरुवात होणार असल्याचे संकेत आहे. पर्यावरण संरक्षणासाठी शासन स्तरावर विविध उपाययोजना केल्या जात आहेत. प्रदुषण कमी करण्यासाठी तसेच पर्यावरणाचा र्‍हास रोखण्यासाठी शासनाने हगणदारी मुक्तीसाठी स्वच्छ भारत तर जलप्रदुषण रोखण्यासाठी नमामी गंगे यांसारखे नाविन्यपूर्ण उपक्रम हाती घेतले आहे. मात्र पर्यावरणाचा र्‍हास होतच असून प्रदुषणाच्या समस्येत वाढ होत आहे. दरम्यान पाचोरा शहरालगत असलेल्या नदी काठावर मोठ्या विटभट्टी सुरु असल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्‍न उभा राहिला असून विटभट्टी परिसरातील रहिवाशांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे.

या भागातील रहिवासी त्रस्त
पाचोरा शहरामधुन हिवरा नदी गेलेली आहे. या नदी काठावर मोठ्या प्रमाणात विटभट्टया सुरु आहे. कृष्णापूरी, त्र्यंबकनगर, कोंडवाडा गल्ली, पाचोरा-भडगाव परिसर, हायवे पूल परिसरातील नागरिकांना विटभट्टीमुळे मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे. उन्हाची तिव्रता अधिक असल्याने आणि त्यातच धुरांमुळे परिसरातील नागरिकांचे जगणे मुश्किल झाले असल्याचे चित्र आहे.

विटभट्टी वाल्यांना राजकीय आश्रय?
पाचोरा परिसरात मोठ्या प्रमाणात विटभट्टी असल्याने शहरातील नागरिकांना याचा प्रचंड त्रास सहन करावा लागतो आहे. विटभट्टी बंद करण्यात यावे अशी मागणी अनेक वेळा करण्यात आली आहे, मात्र विटभट्टी चालाकांवर राजकीय मेहर नजर असल्याने त्यांच्यावर कारवाई होत नसल्याचे परिसरातील नागरिकांमध्ये चर्चा सुरु आहे.

तहसिल समोर उपोषण?
विटभट्टी हटविण्याची मागणीबाबत तहसिलदार यांना अनेक वेळा निवेदन देण्यात आले. विटभट्टी हटविण्याची कार्यवाही करण्यात येऊन या समस्येपासून नागरिकांची सुटका करावी अशी मागणी परिसरातील नागरिक करीत आहे. विटभट्टी बंद न केल्यास तीव्र आंदोलन छेडण्यात येऊन तहसिल कार्यालयासमोर उपोषण करण्याचा इशारा त्रस्त नागरिकांनी दिला आहे.

तहसिलदारांकडून कारवाई नाही
शहरालगतच विटभट्टी असल्याने दिवसभर विटभट्टीचा धुराडा सुरु असतो. विटभट्टीच्या धुराड्यामुळे प्रदुषणात वाढ झाल्याने परिसरातील नागरिकांवर त्याचा विपरीत परिणाम होत आहे. परिसरातील रुग्णांच्या संख्येत वाढ झाले आहे. शहरालगत सुरु असलेल्या विटभट्टया कायमचे बंद करण्यात यावी अशी मागणी पाचोरा शहरातील नागरिकांनी केली. मागणीचे निवेदन 26 मे रोजी तहसिलदार यांना दिले, मात्र तहसिलदारांनी अद्यापही मागणीबाबत कारवाई केली नसल्याचे चित्र आहे.