सोलापूर-पंढरपूरला जाणाऱ्या भाविकांसाठी एसटी महामंडळाकडून नवीन बससेवा सुरू करण्यात आली आहे. शिवशाहीप्रमाणे असणाऱ्या या सेवेचे ‘विठाई’ असे नाव आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते आज पंढरपुरात या सेवेचे उद्घाटन करण्यात आले. परिवहन मंत्री दिवाकर रावते यांची ही संकल्पना आहे.
पंढरपुर हे वारकऱ्यांचे तीर्थक्षेत्र म्हणून ओळखले जाते. आषाढी एकादशीनिमित्त दहा लाखांहून अधिक भाविक विठ्ठल दर्शनासाठी पंढरपुरात येत असतात. विठ्ठलभक्तांचा हा ओघ राज्याच्या कानाकोपऱ्यातून सुरू असतो. अनेक भाविक परराज्यातूनही येतात. पंढरीत येण्यासाठी ठिकठिकाणाहून एसटीच्या नियमित बसेससह प्रासंगिक करारावर बस उपलब्ध करून दिल्या जातात. अनेक भाविक खासगी वाहनांने प्रवास करतात. पण अनेकदा त्यांना मार्गावर विविध अडचणींचा सामना करावा लागतो.
मुक्काम, जेवणाची गैरसोय होते. ही बाब लक्षात घेऊन महामंडळाने खास पंढरपुरात येणाऱ्या भाविकांसाठी ‘विठाई’ ही नवीन बससेवा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला.