विठू नामाच्या गजरात देहूनगरी दमदुमली

0

देहूगाव : तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा असे म्हणत, जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्याचे शुक्रवारी दुपारी येथून प्रस्थान झाले असले तरी विठू नामाच्या गजरात संपूर्ण देहूनगरी नाहून निघाली. वारकर्‍यांची मांदियाळी आणि हरिनामाने गजबजलेली देहूनगरी 332व्या प्रस्थान सोहळ्यासाठी सज्ज झाली आहे.

प्रस्थान सोहळ्याचा कार्यक्रम
शुक्रवारी पहाटे पाचला श्रींची महापूजा व शिळामंदिरातील महापूजा पालखी सोहळाप्रमुख व विश्वस्तांच्या हस्ते झाले. सकाळी 5.30 ते 6 दरम्यान पालखी सोहळ्याचे जनक तपोनिधी नारायणमहाराज समाधीची महापूजा करण्यात आली. सहाला विश्‍वस्त व मनुशेठ वादिया परिवाराच्या हस्ते महापूजा झाली. सकाळी 10 ते दुपारी 12 दरम्यान संभाजीमहाराज मोरे यांचे पालखी प्रस्थान सोहळा सप्ताह काल्याचे कीर्तन आणि सकाळी 9 ते 11 दरम्यान संत तुकाराममहाराजांच्या पादुकांची इनामदार वाड्यात दिलीपमहाराज मोरे इनामदार यांच्या हस्ते महापूजा करण्यात आली. त्यानंतर पादुका मुख्य मंदिरात प्रस्थानपूर्व पूजेसाठी आणल्या जातील. दुपारी 2.30 च्या सुमारास पालखी प्रस्थान सोहळ्यास सुरवात झाली असून सायंकाळी पाचला पालखी मंदिर प्रदक्षिणेसाठी निघाली. सायंकाळी 6.30 वा. पालखी इनामदारवाड्यात पहिल्या मुक्कामाच्या ठिकाणी पोहोचली आणि तेथे मुख्य आरती करण्यात आली.

दराची चोख व्यवस्था
प्रस्थान सोहळ्यास सिक्कीमचे राज्यपाल श्रीनिवास पाटील, राज्याचे सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे, पालक मंत्री गिरीष बापट यांच्यासह विविध मान्यवर व शासकीय अधिकारी उपस्थित होते. मंदिर व परिसराची स्वच्छता झाली आहे. 32 सीसीटीव्ही कॅमेर्‍यांची संपूर्ण मंदिर परिसरावर नजर आहे. धातूशोधक यंत्र लावण्यात आले आहे. शुक्रवारी सकाळपासूनच दिंड्यांना प्रदक्षिणेसाठी मुख्य प्रवेशद्वारातून प्रवेश देण्यात येणार असून, उत्तर दरवाजाने त्यांना बाहेर पडावे लागणार आहे.

पालखीचा पुढचा प्रवास
गुुरुवारी सायंकाळी पाचच्या सुमारास बॉम्बनाशक दलाने व श्वान पथकाने मंदिर परिसराची तपासणी केली. यावेळी नेहमीपेक्षा तिप्पट पोलिसांचा बंदोबस्त लावण्यात आला आहे. पालखीचा पहिला मुक्काम गावातील देऊळवाड्याशेजारील इनामदारवाड्यात असेल. तेथून शनिवारी 17 जूनला पालखी आकुर्डीकडे रवाना होणार आहे. आकुर्डीहून रविवारी 18 जूनला पालखी सोहळा पुण्याकडे कूच करणार आहे.

पालखी सोहळ्यात वारकर्‍यांची गैरसोय होऊ नये म्हणून खास व्यवस्था ठेवण्यात आली आहे. याशिवाय डॉक्टर आणि अँब्युलन्सचे पथकही सोबत असणार आहे. त्यामुळे शुक्रवारी विठूनामाचा गजरात देहूनगरी दुमदुमून जाईल. तर आज ज्ञानेश्‍वर महाराजांच्या पालखीचे प्रस्थान होणार आहे.