विठ्ठलदर्शन आता टोकनपद्धतीने!

0

वारकर्‍यांना तासंतास रांगेत उभे राहण्याची गरज नाही!

पंढरपूर : राज्यातील वारकरी सांप्रदायासाठी आणि विठ्ठल भक्तांसाठी मंदीर समितीने एक गोड निर्णय घेतला असून, आता यापुढे विठुरायाचे दर्शन तिरुपतीच्या धर्तीवर टोकन पद्धतीने दिले जाणार आहे. या टोकनसाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही. गुरुवारी झालेल्या मंदीर समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. येत्या कार्तिकी यात्रेपासून याची सुरुवात करण्याची तयारी समितीने सुरु केल्याचे समितीचे अध्यक्ष अतुल भोसले यांनी सांगितले.

तासाला तीन हजार भाविक घेणार दर्शन
विठुरायाच्या दर्शनासाठी वर्षातून सव्वा ते दीड कोटी भाविक पंढरपूरला येत असल्याने त्यांना सुलभ दर्शन देण्यासाठी सुरु होणार्‍या या टोकन दर्शन व्यवस्थेचा संपूर्ण खर्च केंद्र सरकार करणार असल्याने यासाठी समिती अथवा भाविकांना आर्थिक झळ बसणार नाही. याशिवाय, भाविकाला पंढरपुरात आल्यावर आपल्या दर्शनाची नक्की वेळ समजणार असल्याने उरलेल्या वेळेत तो खरेदी व इतर भागाचे पर्यटन करण्यास मोकळा राहणार आहे. एका मिनिटाला सर्वसाधारणपणे 50 भाविक विठ्ठलाचे दर्शन घेतात, त्यानुसार तासाला तीन हजार भाविक गृहित धरून रोज तेवढेच टोकन भाविकांना दिले जाणार आहेत. बसस्थानक, रेल्वे स्टेशन आणि मंदिर परिसरात टोकन देणारे स्टॉल समिती उभारणार असून, आलेल्या दर्शनासाठी भाविकाला प्रथम आपल्या दर्शनाचे टोकन घ्यावे लागणार आहे. या व्यवस्थेनंतर आता ऑनलाईन दर्शन व्यवस्था आणि मुखदर्शन व्यवस्थेचादेखील विचार केला जाणार असल्याचे अतुल भोसले यांनी सांगितले. गुरुवारी झालेल्या बैठकीत चंद्रभागा वाळवंट, प्रदक्षिणा मार्ग, मंदीर परिसर याच्या सफाईची जबाबदारी समितीने घेण्याचा निर्णय घेतला असून, यासाठी लवकरच निविदा प्रकाशित केल्या जाणार आहेत. याशिवाय, प्रसाद व्यवस्थादेखील खाजगी पद्धतीने निविदा काढून देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या बैठकीला आमदार राम कदम हे मात्र गैरहजर होते.