पुणे । पुणे महापालिकेने विठ्ठलवाडी कमान ते वडगावपर्यंत असलेला नदीकाठचा रस्ता एनजीटीच्या आदेशानुसार उखडण्यास सुरुवात केली आहे. हा 30 मीटर डीपी रस्ता तयार करण्यासाठी यापूर्वी पालिकेला 12 कोटी 30 लाख रुपये खर्च आला होता. या रस्त्याची खोदाई केल्यानंतर माती उचलण्यासाठी पावणे तीन कोटी रुपये खर्च करण्याचे काम निखिल कन्सट्रक्शन यांना देण्यास स्थायी समितीने नुकतीच मंजुरी दिली आहे. त्यामुळे महापालिकेचा हा रस्ता तयार करणे ते काढून टाकणे हे सर्व मिळून 15 कोटी 25 लाख रुपयांचा खर्च वाया गेला आहे.
नदीपात्रातील मंगल कार्यालये आणि बांधकामे काढून टाकण्याचे आदेश एनजीटीने दिले आहेत. त्यामुळे विठ्ठलवाडी कमान ते वडगावपर्यंतच्या नदीकाठचा 30 मीटर डीपी रस्ता काढावा लागणार आहे. त्याच्या कामास महापालिकेतर्फे सुरुवात केली असून त्यासाठी पालिकेने या रस्त्याची खोदाई केल्यानंतर माती उचलण्याच्या कामासाठी निविदा मागविल्या होत्या. त्यात निखिल कन्स्ट्रक्शन यांची 2 कोटी 69 लाख रुपयांची निविदा आली होती. ही निविदा 20 टक्क्यांनी कमी आहे. त्यामुळे स्थायी समितीने त्यांना काम देण्यास मंजुरी दिली. त्यानंतर शुक्रवारपासून रस्ता उखडण्यास सुरुवात झाली आहे. आठवड्याभरात हे काम पूर्ण होण्याची शक्यता आहे.