मुंबई | ‘विठ्ठलाला बडव्यांनी घेरलेय,’ असे सांगून बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना सोडून राज ठाकरे यांनी मनसे हा नवा पक्ष काढला खरे; पण एक तप पूर्ण होण्याच्या आतच तिथेही ‘भक्तांना विठ्ठल भेटेना’ अशी स्थिती निर्माण झाली आहे. पराभवामागून पराभव पचवावे लागलेल्या मनसेअध्यक्ष राज ठाकरे यांनी आता आषाढी आटोपताच पंढरपूरच्या विठ्ठलाचे आशीर्वाद घेऊन पक्षाची सर्व सूत्रे स्वत:कडे घेतली आहेत. बाळा नांदगावकर, संदीप दळवी, शिशिर शिंदे, नितीन सरदेसाई ही मनसेची मुंबईतील सर्व बडव्यांची संस्थाने राज यांनी बरखास्त केली आहेत. राज यांच्या ‘इनर सर्कल’मधील दुसऱ्या फळीतील नेत्यांना हा मोठा धक्का मानला जात असला तरी बडव्यांचे कोंडाळे हटल्याने सर्वसामान्य मनसैनिक जाम खूष झाला आहे. पक्षात आता खरोखरच ‘नवनिर्माण’चे वारे वाहण्याची आशा मनसैनिकाला वाटू लागली आहे. मीरा-भाईंदरमध्ये निवडणूक तोंडावर असताना संघटनेतील बदलांमुळे पक्षकार्यकर्त्यात चैतन्य परतू शकते.
विधानसभेअंर्तगत बैठकांचा परिणाम
गेल्या विधानसभा निवडणुकीत ‘मनसे’चा निकाल लागल्यापासूनच राज अस्वस्थ आहेत. त्यात मुंबईत निराशा तर नाशिक महापालिकेत सुपडा साफ झाल्याने राज वैतागले होते. पक्षाला लागलेल्या घरघरीची कारणे शोधून काढण्यासाठी त्यांनी संपूर्ण जून महिन्यात मुंबईतील सर्व गटाध्यक्ष व उपशाखाध्यक्षांच्या विधानसभानिहाय बैठका घेतल्या होत्या. त्यातून पक्ष स्थापनेनंतर प्रथमच राज यांनी कार्यकर्त्यांशी थेट संवाद साधला. या बैठकांमध्ये पक्षातील गटबाजीपासून ते पक्षवाढीसाठी काय करावे, याच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या वेगवेगळ्या सूचना राज यांनी स्वत: एका वहीत लिहून घेल्या होत्या. भायखळा विधानसभेअंर्तगत बैठकीतच राज यांनी ‘नवी विटी- नवा दांडू’ची संकल्पना मांडली होती. कार्यकर्त्यांनी नेत्यांबाबत तक्रार केल्यानंतर, तुम्ही कोणाकडे पाहून पक्षात आलात, असा सवाल करून राज यांनी जुलैपासून पक्षातील चित्र बदलल्याचे दिसेल, असे स्पष्ट केले होते.
नव्याने पक्षाची पुनर्बांधणी सुरू
कार्यकर्त्यांच्या सूचनानुसार, आता पराभवाची मालिका खंडित करण्यासाठी राज ठाकरेंनी नव्याने पक्षाची पुनर्बांधणी सुरू केली आहे. मनसेतल्या संघटनात्मक फेरबदलांमध्ये बड्या नेत्यांच्या समर्थकांना घरचा रस्ता दाखवला जात आहे. विशेष म्हणजे फेरबदलांमध्ये दुसऱ्या फळीतल्या नेत्यांना कुठेही स्थान नाही. या सर्व नव्या नियुक्त्या राज ठाकरे स्वतः करत आहेत. त्यामुळे मनसेतली जुनी संस्थाने बरखास्त होत असल्याचे चित्र दिसत आहे. मनसेमधली मरगळ झकटून काढण्यासाठी स्वतः राज ठाकरे यांनीच पक्षाची सूत्रे हाती घेतल्याने दुसऱ्या फळीतल्या नेत्यांचे चांगलेच धाबी दणाणली आहेत.
तेव्हाही एकटेच व्यासपीठावर…
पक्षाच्या कार्यपद्धतीत बदल होणार, याचे काही संकेत राज यांनी विधानसभा पराभवानंतरच्या रवींद्र नाट्यमंदिरातील मेळाव्यातच दिले होते. त्यावेळी संपूर्ण बैठकीत राज ठाकरे हे एकटेच व्यासपीठावर होते. इतर प्रमुख नेते मात्र व्यासपीठाच्या खाली पहिल्या रांगेत बसले होते. याशिवाय राज यांनी भाषणात काही युवा नेत्यांच्या कामाचे कौतुक केले. मात्र, बड्या नेत्यांच्या नावाचा साधा उल्लेखही केला नव्हता.
काय होत्या कार्यकर्त्यांच्या तक्रारी, सूचना
राज यांनी स्वत कार्यकर्त्यांना थेट भेटलेच पाहिजे नेते असतात कुठे? आम्हाला कधीच कुणी भेटत नाही रवींद्र नाट्यमंदिरात सांगितले होते, की स्काइपच्या माध्यमातून कार्यकर्त्यांशी नेहमी संवाद साधणार. त्यानुसार, तुम्ही दरमहा व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संपर्क साधा.
भायखळ्यात बाळा नांदगावकर यांचा एक उपाध्यक्ष संजय नाईक यांचा दुसरा गट आहे. या गटबाजीचा फटका महापालिका निवडणुकीत पक्षाला बसला. अशा परिस्थितीत काम करायचे कसे?
राज यांनी कामगार संघटना, रस्ते आस्थापना, जनहित कक्ष, रोजगार स्वयंरोजगार, जनाधिकार व लॉटरी सेना या अंगीकृत संघटनांचे सर्व पदाधिकारी बरखास्त करण्याचा निर्णय दोन दिवसांपूर्वी जाहीर केला. पक्षाच्या रचनेत तसेच नेत्यांमध्येही काही बदल करण्यात येणार असून त्याचाच एक भाग म्हणून राज यांनी कामगार संघटना, रस्ते आस्थापना, जनहित कक्ष, रोजगार स्वयंरोजगार, जनाधिकार व लॉटरी सेना या अंगीकृत संघटनांचे सर्व पदाधिकारी बरखास्त करण्याचा निर्णय दोन दिवसांपूर्वी जाहीर केला.
कोणाला काय धक्का
1. बाळा नांदगावकर
भायखळा, शिवडीतील नांदगावकरांनी यापूर्वी नियुक्त केलेले विभागाध्यक्ष बदलले.
2. संदीप दळवी
अंधेरीतील वर्चस्वाला शह, उपाध्यक्षपदावरून डच्चू .
३. शिशिर शिंदे
पक्षसंघटनात निष्क्रियतेबाबत खुलासा मागितला.
४. नितीन सरदेसाई
दादरमध्ये संदीप देशपांडे आणि यशवंत किल्लेदार यांना बढती, त्यामुळे पक्ष संघटनेतले स्थान डळमळीत.