विठ्ठल गजरात तुकोबांच्या पालखीचे प्रस्थान

0

देहूतील इनामदार वाड्यात केला पहिला मुक्काम

आज पिंपरी-चिंचवड शहरात होणार आगमन रीवरीवरीवष

पिंपरी-चिंचवड : टाळ-मृदंगाचा गजर, विणेचा झंकार, आणि जय जय विठ्ठल, जय हरी विठ्ठल नामाचा जयघोष अशा भक्तिरसाने परिपूर्ण भरलेल्या वातावरणात संत तुकाराम महाराजांच्या पालखीने प्रस्थान ठेवले. यानंतर पालखीचा पहिला मुक्काम देहू गावातील इनामदार वाड्यात राहिला. प्रस्थानापूर्वी पालकमंत्री गिरीश बापट यांनी सपत्नीक तुकाराम महारांच्या पादुकांचे पूजन केले. यावेळी खासदार अमर साबळे, श्रीरंग बारणे, गिरीश बापट, आमदार बाळा भेगडे आदी उपस्थित होते.

पहाटे पाचपासून नैमित्तिक पूजा
पहाटे पाच वाजता मुख्य मंदिरात महापूजा झाली. त्यानंतर सहा वाजता वैकुंठगमन स्थान मंदिरात महापूजा झाली. सकाळी सात वाजता तपोनिधी नारायण महाराज समाधीपूजा झाली. सकाळी अकराच्या सुमारास सुनील घोडेकर यांनी तुकोबांच्या पादुकांना चकाकी देऊन त्या मसलेकर यांच्या डोक्यावर दिल्या. त्या पादुका म्हातारबाबा दिंडीने इनामदार वाड्यात आणण्यात आल्या. दिलीप मोरे-इनामदार यांनी इनामदार वाड्यात पादुकांची पूजा केली. त्यानंतर पुन्हा बाराच्या सुमारास पादुका डोक्यावर घेऊन म्हातारबाबा दिंडीने मुख्य मंदिरासमोरील भजनी मंडपात आणण्यात आल्या. सकाळी दहा ते बारा या वेळेत संभाजी महाराज मोरे-देहूकर यांचे कीर्तन झाले.

लाखो वैष्णवांची दाटी
संत तुकाराम महाराजांच्या या 333 व्या पालखी प्रस्थान सोहळा ‘याची देही याची डोळा’ पाहण्यासाठी लाखो वैष्णवांनी इंद्रायणीकाठी दाटी केली होती. या सोहळयासाठी राज्यभरातून लाखो भाविक देहूत दाखल झाले होते. पालखीने जसे प्रस्थान ठेवले तसे टाळ-मृदंगाचा आवाज टीपेला पोहोचला. वारक-यांचा उत्साह दुणावला. वारकरी विठ्ठलनामासोबत डोलू लागले, नाचू लागले. इंद्रायणीच्या लाटांनीही या सुरात आपले सूर मिसळले. अवघा आसमंत विठ्ठलमय झाला. काहींना तुकाबांच्या पादुकांवर माथा ठेवण्याचे भाग्य लाभले. त्यांनी धन्यत्वाचा अनुभव घेतला. तर काहींनी मनोभावे नमस्कार करीत तुकोंबाचरणी आपली सेवा रुजू केली. हरिनामाच्या गजरात अवघी देहुनगरी दुमदुमून गेली.