विठ्ठल मंदिर समितीच्या अध्यक्षपदी गहिनीनाथ महाराज

0

मुंबई:- महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या श्री विठ्ठल रुक्‍मिणी मंदिराच्या व्यवस्थापनासाठी गठीत केलेल्या समितीवर अध्यक्ष म्हणून गहिनीनाथ महाराज औसेकर यांची नियुक्ती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. 30 जून पूर्वी शासनाने नवीन मंदिर समितीची नियुक्त करावी, असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिले होते. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी गहिनीनाथ महाराजांची नियुक्ती केली. हभप गहिनीनाथ महाराज औसेकर हे श्री वीरनाथ मल्लनाथ महाराज संस्थान औसा या नाथ संस्थानचे प्रमुख असून मुख्यमंत्र्यांचे निकटवर्तीय मानले जातात.

अशी असेल नवीन समिती
न्यायालयाच्या आदेशामुळे शासनाला श्री विठ्ठल रुक्‍मिणी मंदिर कायदा 1973 नुसार अध्यक्ष व अन्य अकरा सदस्य अशी समिती नियुक्त करावी लागणार आहे. यामध्ये आता अध्यक्ष हभप औसेकर महाराज यांच्यासह विधानसभा सदस्य, विधान परिषद सदस्य, पंढरपूर नगराध्यक्ष, एक महिला, एक अनुसुचित जातीची व्यक्ती, एक अनुसुचित जमातीची व्यक्ती आणि अन्य पाच अशी अकरा जणांची समिती असेल.

अनेक महाराज इच्छुक!
कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेस आघाडी सरकारच्या काळात आण्णा डांगे यांच्या अध्यक्षतेखालील सहा सदस्यांची अस्थायी समिती नियुक्त करण्यात आली होती. भाजपा -शिवसेना युतीचे शासन सत्तेवर आल्यानंतर ही अस्थायी समिती बरखास्त करण्यात आली होती. त्यानंतर शासनाने तत्काळ नवीन मंदिर समिती नियुक्त न करता जिल्हाधिकाऱ्यांची समितीचे सभापती म्हणून नियुक्ती केली. तेंव्हा पासून जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली प्रांताधिकारी तसचे मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी व व्यवस्थापक मंदिर व्यवस्थापनाचे काम पाहत होते. समितीवर अध्यक्ष तसेच सदस्य म्हणून नियुक्ती व्हावी यासाठी राज्यातील अनेक दिग्गज तसेच वारकरी संप्रदायातील महाराज मंडळी प्रयत्नशील होते. यामध्ये अखेर औसेकर महाराजांनी बाजी मारली.

वादाची पार्श्वभूमी
पंढरपूरमध्ये मोठ्या एकादशीच्या काळात प्रचंड अव्यवस्था होते. तसेच मंदिरामध्ये काही लोकांच्या अरेरावीपणामुळे भाविकांच्या भावनेला ठेस पोहोचविण्याच्या घटना समोर आल्या होत्या. यापूर्वी अनेक वेळा समितीचे अध्यक्ष आणि सदस्य तसेच कार्यकारी अधिकारी यांच्यात मतभेद झाले. अनेक वेळा त्यांच्यातील वाद चव्हाट्यावर आले. त्यामुळे भाविकांना सुविधा देण्यासाठी नियोजत केलेल्या कामांवर परिणाम झाला. आता नवीन समिती नियुक्त करताना समन्वयाने काम करणाऱ्या, वारकऱ्यांच्या विषयी जिव्हाळा असलेल्या व्यक्तीची निवड व्हावी अशी वारकऱ्यांची अपेक्षा होती.